गॅस टंचाईमुळे रेल्वेत ‘इंडक्शन कुकिंग’, ‘आयआरसीटीसी’च्या निर्णयामुळे सरकार पडले तोंडघशी

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

इराण-अमेरिका-इस्रायल यांच्यातील युद्धामुळे हिंदुस्थानात सध्या गॅसची टंचाई उद्भवली आहे. एलपीजी टंचाई होत असल्याने आणि गॅसच्या किंमतीत वाढ झाल्यामुळे भारतीय रेल्वे खानपान आणि पर्यटन महामंडळ (आयआरसीटीसी)ने रेल्वेत जेवण बनवण्यासाठी एलपीजीऐवजी ‘इलेक्ट्रिक इंडक्शन स्टोव्ह’चा (विजेवरील शेगडय़ा) वापर करण्याचा निर्णय घेतला आहे. आयआरसीटीसीच्या या निर्णयामुळे केंद्र सरकार अखेर तोंडघशी पडले आहे. देशात गॅसची टंचाई असूनही केंद्र सरकार हे मानायला तयार नाही. परंतु रेल्वेच्या या निर्णयामुळे अखेर सरकारचा खोटेपणा उघडकीस आला आहे.

काही वर्षांपूर्वी सुरक्षेच्या कारणास्तव धावत्या ट्रेनमध्ये पूर्ण जेवण बनवणे बंद करण्यात आले होते. त्याऐवजी ‘बेस किचन’ संकल्पना लागू करून विविध स्थानकांवरून तयार जेवण ट्रेनमध्ये चढवले जात होते. परंतु सध्याच्या बदलत्या परिस्थितीमुळे हा जुना नियम बदलण्यात येत आहे. आयआरसीटीसी आता अत्याधुनिक ‘लिंके हॉफमन बुश’ पॅन्ट्री कारमध्ये विजेचा वापर करून अन्न तयार करेल. या आधुनिक पॅन्ट्री कारमध्ये आवश्यक ती सर्व सुरक्षा यंत्रणा उपलब्ध आहे. दररोज जवळपास 1400 गाडय़ांमधून प्रवास करणाऱया 17 लाख प्रवाशांना या सेवेचा थेट फायदा होणार आहे. पुरेशा सुरक्षा पायाभूत सुविधा असलेल्या पॅन्ट्री कारमध्येच व्हेंडर्सना अन्न शिजवण्याची परवानगी देण्यात आली आहे. केवळ ट्रेनमध्येच नव्हे, तर मोठय़ा रेल्वे स्थानकांवरही आता इंडक्शन कुकिंग सुरू करण्यात आले आहे, अशी माहिती आयआरसीटीसीचे अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक संजय कुमार यांनी दिली.

 देशभरात धावणाऱया सुपरफास्ट एक्सप्रेस रेल्वे गाडय़ा राजधानी, शताब्दी, दुरंतो आणि वंदे भारतसारख्या प्रीमियम ट्रेनमध्ये एलएचबी कोच असतात, जे प्रवासासाठी अधिक सुरक्षित मानले जातात. आता इंडक्शन स्टोव्हच्या वापरामुळे गॅस सिलिंडरच्या आगीचा धोका पूर्णपणे टळणार आहे, ज्यामुळे प्रवाशांचा प्रवास अधिक सुरक्षित आणि चविष्ट होणार आहे, असे आयआरसीटीसीने म्हटले आहे.