शनिवारपर्यंत धर्मेंद्र प्रधानांनी राजीनामा दिला नाही तर देशव्यापी आंदोलन करणार; अभिजीत दिपकेंचा केंद्र सरकारला अल्टिमेटम

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

देशातील नीट, सीबीएससी आणि इतर स्पर्धा परीक्षांमधील वाढता गोंधळ, पेपरफुटी आणि विद्यार्थ्यांच्या आत्महत्येच्या वाढत्या घटना पाहता, केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी या संपूर्ण प्रकाराची नैतिक जबाबदारी स्वीकारून तात्काळ राजीनामा द्यावा. त्यांनी शनिवारपर्यंत राजीनामा न दिल्यास देशभरात उग्र आंदोलन छेडण्यात येईल, असा थेट इशारा कॉक्रोच जनता पार्टीचे संस्थापक अभिजीत दिपके यांनी केंद्र सरकारला दिला आहे. पुण्यात आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते.

पत्रकार परिषदेत बोलताना अभिजीत दिपके म्हणाले की, नीट परीक्षेतील गैरप्रकार आणि तणावामुळे आतापर्यंत सहा ते सात विद्यार्थ्यांनी आत्महत्या केली आहे. केवळ नीटच नव्हे, तर सीबीएससीचे १७ लाख, तर एसएससी जीडीचे १६ लाख विद्यार्थी प्रभावित झाले आहेत. सीयूईटी आणि इतर परीक्षांमधील गोंधळ पाहता देशातील तब्बल एक कोटीहून अधिक विद्यार्थ्यांचे भवितव्य सध्या टांगणीला लागले आहे. जे विद्यार्थी उद्या डॉक्टर बनून इतरांचे प्राण वाचवू शकले असते, त्यांना व्यवस्थेच्या अपयशामुळे स्वतःचा जीव गमवावा लागला आहे. लाखो-करोडो विद्यार्थ्यांचे भविष्य बरबाद होत असून याची जबाबदारी सरकारने घ्यायलाच हवी, अशी संतप्त प्रतिक्रिया त्यांनी व्यक्त केली.

देशात सरकारचे कोणतेही उत्तरदायित्व उरलेले नाही, असा आरोप करत दिपके पुढे म्हणाले की, पेपर लीक होत आहेत, सर्व्हर डाऊन होत आहेत आणि विद्यार्थी न्याय मागून थकून गेले आहेत. या सर्व गोंधळाची जबाबदारी घेऊन धर्मेंद्र प्रधान यांनी राजीनामा द्यावा, याच मागणीसाठी ६ जून रोजी दिल्लीतील जंतरमंतर येथे हजारो तरुणांच्या उपस्थितीत शांततापूर्ण आंदोलन करण्यात आले होते. यावरून हे सिद्ध झाले आहे की, देशातील तरुण आता घाबरणार नाही आणि तो अन्यायापुढे मागेही हटणार नाही.

शिक्षणमंत्र्यांना शनिवारपर्यंतचा अल्टिमेटम देताना त्यांनी आंदोलनाची पुढील दिशा स्पष्ट केली. जर धर्मेंद्र प्रधान यांनी राजीनामा दिला नाही, तर उद्या दुपारी चार वाजता पुण्यापासून शांततापूर्ण आंदोलनाची सुरुवात केली जाईल. त्यानंतर लखनौ, अमृतसर, जयपूर आणि बंगळुरू यांसारख्या प्रमुख शहरांमध्येही निदर्शने केली जातील. एवढे होऊनही सरकारने दखल न घेतल्यास येत्या २० तारखेला देशभरातील तरुण दिल्लीत एकवटतील आणि धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा घेतल्याशिवाय तिथून माघारी परतणार नाहीत, असा ठाम निर्धार अभिजीत दिपके यांनी या पत्रकार परिषदेत व्यक्त केला.