
मनी लॉण्डरिंगची भीती दाखवत तोतया सीबीआय अधिकाऱ्याने वृद्ध महिलेला अटकेची भीती दाखवून 15 लाख रुपये उकळल्याचा प्रकार समोर आला आहे. याप्रकरणी मध्य प्रादेशिक सायबर पोलिसांनी दोन जणांविरोधात गुन्हा नोंद केला आहे.
तक्रारदार या सेवानिवृत्त बँक अधिकारी आहेत. गेल्या आठवडय़ात त्यांना एका नंबरवरून फोन आला. त्याने तो एसबीआयमधून बोलत असल्याचे भासवले. तुम्ही क्रेडिट कार्ड घेतले आहे, 1 लाख 9 हजार रुपयांचा वापर केला असून ते पैसे परत केले नसल्याचे ठगाने महिलेला सांगितले. तेव्हा महिलेने कोणतेही कार्ड घेतले नसल्याचे ठगांना सांगितले. मनी लॉण्डरिंगमध्ये कार्डचा वापर झाला अशी त्याने भीती दाखवली. त्यानंतर चौकशी झाल्यावर एनओसी मिळेल असे सांगून तो फोन तोतया सीबीआय अधिकाऱ्याकडे ट्रान्स्फर केला. तेव्हा एक जण पोलीस वर्दीत बसला होता. त्याने चौकशीच्या नावाखाली खात्याची माहिती घेतली. त्यानंतर आरबीआयचा लोगो असलेले पत्र महिलेला पाठवले. त्या एका खात्याचा नंबर होता. भीतीपोटी महिलेने ते पैसे त्या खात्यात जमा केले. फसवणूक झाल्याचे लक्षात येताच त्यांनी सायबर पोलीस ठाण्यात धाव घेतली.
सराईत चोरटे गजाआड
चोरीच्या उद्देशाने आलेल्या पाच जणांच्या टोळीला मालाड पोलिसांनी बेड्या ठोकल्या. संदीप गुप्ता, इकबाल शेख, केतन इर्ले, अरबाज शेख, दिलीप बारसिंगे अशी त्यांची नावे आहेत. मालाड पोलिसांचे पथकाला गस्तीदरम्यान नटराज मार्केट येथे पाच जण संशयास्पद फिरताना दिसले. त्यातील एक संदीप गुप्ता असल्याचे समोर आले. पोलिसांनी त्या जणांना शिताफीने ताब्यात घेतले. त्यांना चौकशीसाठी मालाड पोलीस ठाण्यात आणले. संदीपविरोधात जुहू, समतानगर पोलीस ठाण्यात आठ, इकबालविरोधात दहिसर आणि दिंडोशी पोलीस ठाण्यात सात, अरबाज आणि केतनविरोधात बोरिवली रेल्वे आणि अंधेरी रेल्वे पोलीस ठाण्यात दोन तसेच अनिकेतविरोधात बोरिवली रेल्वे पोलीस ठाण्यात एक गुन्हा नोंद आहे.



























































