
शिंदे गटाचा स्वीकृत नगरसेवक साहिल चौगुले याने एका विवाहित तरुणीवर फक्त बलात्कारच केला नाही तर तिचे कुटुंब उद्ध्वस्त केले आहे. त्याच्यावर कडक कारवाई करण्याऐवजी रबाळे पोलीस त्याला पाठीशी घालत आहेत असा आरोप शिवसेनेने केला आहे. पोलिसांच्या डोळ्यांवर पैशांची पट्टी बांधलेली असल्याने ते साहिलला वाचवण्यासाठी जीवाचा आटापिटा करत आहेत. त्यामुळे या गुन्ह्याचा तपास अधिकारी बदलण्यात यावा आणि गुन्ह्याचा तपास करण्यासाठी विशेष तपास पथक नेमण्यात यावे, अशी मागणी शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाच्या वतीने आज करण्यात आली.
२६ वर्षीय तरुणीवर साहिल चौगुले याने बलात्कार केल्यानंतर तिचे अश्लील फोटो आणि व्हिडिओ काढले. ते व्हायरल करण्याची धमकी देऊन दोन वर्षांपासून तिच्यावर सातत्याने लैंगिक अत्याचार केला. इतका गंभीर गुन्हा घडूनही रबाळे पोलीस साहिल चौगुले याला वाचवण्यासाठी जीवाचे रान करत आहेत. तपास अधिकाऱ्याने दाखवलेल्या हलगर्जीपणामुळे न्यायालयात आरोपीला दोन दिवसांचा अंतरिम जामीन मिळाला आहे. हा प्रकार पोलिसांच्या तपासावर प्रश्नचिन्ह निर्माण करणारा असल्याचा आरोप शिवसेना उपनेत्या किशोरी पेडणेकर यांनी आज पत्रकार परिषदेत केला.
याप्रसंगी शिवसेना सचिव सुरेखा फाटक, शिवसेना नवी मुंबई जिल्हा संघटक रंजना नेवाळकर, जिल्हाप्रमुख प्रकाश पाटील, प्रवीण म्हात्रे, अवदेश शुक्ला, रंजना शिंदे, संतोष घोसाळकर, महेश कोटीवाले, वंदना गोडसे, प्रणाली कदम, कोमल चव्हाण, नंदा कोटे आदी उपस्थित होते.
मोठे लक्ष्मीदर्शन झाल्याची चर्चा
चौगुले कुटुंबाचा इतिहास आणि भूगोल सर्वांना माहिती आहे. साहिल चौगुलेला वाचवण्यासाठी रबाळे पोलिसांना मोठे लक्ष्मीदर्शन झाले असून एका 2 BHK फ्लॅटची तडजोड झाल्याचीही चर्चा आहे, असा आरोप किशोरी पेडणेकर यांनी केला. या प्रकरणाची चौकशी करण्यात यावी यासाठी शिवसेनेचे शिष्टमंडळ लवकरच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेणार असल्याचेही त्यांनी सांगितले.





























































