
अयाज खानची ८७ धावांची विक्रमी खेळी आणि आदित्य धुमाळच्या अचूक गोलंदाजीच्या जोरावर गतविजेत्या एमएससी मराठा रॉयल्सने टी-२० मुंबई लीगमध्ये आपला दबदबा कायम राखला आहे. लीग स्टेजच्या अत्यंत चुरशीच्या आणि महत्त्वाच्या सामन्यात मराठा रॉयल्सने आर्कस अंधेरीचा पराभव करत दिमाखात उपांत्य फेरीत धडक मारली आहे.
प्रथम फलंदाजी करताना आर्कस अंधेरीने मुशीर खानच्या ३६ चेंडूंतील ६२ धावांच्या जोरावर सर्वबाद १६८ धावा फलकावर लावल्या होत्या. मराठा रॉयल्सकडून आदित्य धुमाळने भेदक मारा करत ४ षटकांत अवघ्या १४ धावा देऊन २ बळी घेतले, तर इरफान उमैरने २७ धावांत २ विकेट्स काढत अंधेरीच्या धावसंख्येला वेसण घातली.
१६९ धावांचे आव्हानात्मक लक्ष्य घेऊन मैदानात उतरलेल्या मराठा रॉयल्सची सुरुवात अत्यंत खराब झाली. सलामीवीर साहिल जाधव पहिल्याच चेंडूवर बाद झाला आणि पाठोपाठ कर्णधार सिद्धेश लाडही तंबूत परतला. मात्र, या पडझडीनंतर अयाज खानने सामन्याची सूत्रे हाती घेतली. त्याने अवघ्या ४८ चेंडूंत ६ चौकार आणि ६ षटकारांची आतषबाजी करत ८७ धावांची खेळी केली. त्याला तरुण फलंदाज ओम बांगरने (२९) उत्तम साथ दिली. अखेरच्या षटकांमध्ये तुषार देशपांडेने अवघ्या ६ चेंडूंत २० धावा कुटत फिनिशरची भूमिका चोख बजावली आणि मराठा रॉयल्सच्या विजयावर शिक्कामोर्तब केले.






























































