
गेल्या अनेक वर्षांपासून शेतकऱ्यांना विविध सरकारी योजना व सुविधांबाबत मोलाचे मार्गदर्शन करणाऱ्या किन्हवली येथील कृषी कार्यालयाला टाळे ठोकण्यात आले आहे. या कार्यालयातील सर्व कर्मचाऱ्यांची बदली शहापूर कृषी कार्यालयात केल्याने स्थानिक शेतकऱ्यांना कृषी विषयक योजनांचा लाभ घेण्यासाठी तब्बल २८ किलोमीटर लांब असलेल्या शहापूर येथे पायपीट करावी लागत आहे. अनेकदा या कार्यालयाचा पत्ताच सापडत नसल्याने वेळ व प्रवास खर्च वाया जाऊन बळीराजाच्या पदरी मनस्ताप पडत आहे.
शहापूर तालुक्यात किन्हवली येथील हे एकमेव शासकीय कृषी कार्यालय साधारण चाळीस वर्षांपासून मंडळ अधिकारी, पर्यवेक्षक, कृषी सहायक, शिपाई, पहारेकरी अशा अधिकारी-कर्मचारी वर्गासहित शेतकऱ्यांसाठी सेवेत होते. परंतु कार्यालयाची इमारत मोडकळीस आली असून ती धोकादायक असल्याचे कारण सांगत शहापूर कृषी कार्यालयाने पाच ते सहा वर्षांपासून येथील कामकाज बंद केले व कर्मचारी वर्ग तालुका कार्यालयात वर्ग केला आहे.
किन्हवली येथील कृषी कार्यालय बंद असल्याने ऐन मोसमात शेतकऱ्यांचे मोठे नुकसान होत आहे. खते, बियाणे, कृषी योजना आणि पीक विषयाच्या महत्त्वाच्या कामांसाठी शेतकऱ्यांना २८ किलोमीटर अंतरावरील तालुक्याच्या ठिकाणी शहापूरला हेलपाटे मारावे लागत आहेत. हातातले काम सोडून गेलेल्या अनेक शेतकऱ्यांना या कार्यालयाचा पत्ताच सापडत नसल्याने त्यांचा वेळ व प्रवास खर्चही वाया जातो आहे.
या कार्यालयाकडे प्रशासनाचे दुर्लक्ष होत असून खिडक्या उघड्या पडल्या आहेत. आतमध्ये असलेली काही दस्तऐवज, महत्त्वाची कागदपत्रे पावसाच्या पाण्यात भिजून खराब होण्याचा धोका आहे. या कागदपत्रांना वाळवी लागण्याची शक्यता असून शेतकऱ्यांच्या सोयीसाठी हे कार्यालय सुरू व्हावे अशी मागणी शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाने केली आहे.
शहापूर कार्यालयाचा पदभार स्वीकारल्यानंतर तात्काळ किन्हवली येथील कार्यालयाला भेट देऊन पाहणी केली आहे. जीर्ण इमारत दुरुस्ती किंवा पुनर्निर्माणासाठी पुरेसा निधी उपलब्ध होत नसल्याने सध्यातरी तालुक्यातील तिन्ही मंडळांचा कारभार तालुका कार्यालयातूनच सुरू राहणार आहे. – कुमार जाधव, कृषी अधिकारी, शहापूर





























































