
अजित पवार गटाचा गुरुवारी मुंबईत वर्धापन दिनाचा कार्यक्रम पार पडला. दिवंगत नेते अजित पवार यांच्या निधनानंतरचा हा पहिलाच वर्धापन दिन सोहळा होता. यावेळी बोलताना सुनेत्रा पवार यांनी ”आतापर्यंत सर्वांना समजून घेतलं, पण यापुढे कुणीही अनावश्यक हस्तक्षेप केल्यास विचार केला जाईल”, असा सूचक इशाराच दिला आहे. त्यांच्या या भाषणानंतर सुनेत्रा पवारांचा रोख नक्की कुणावर होता अशा चर्चा राजकीय वर्तुळाच रंगल्या आहेत.
या वर्धापन दिन सोहळ्याला कार्यकर्त्यांना संबोधित करताना सुनेत्रा पवार या भावूक झालेल्या. त्या म्हणाल्या ”आज आपण 27 वा वर्धापन दिन साजरा करत आहोत. आपल्या सर्वांचे नेते अजितदादा यांच्याशिवाय होणारा हा पहिलाच वर्धापन दिन आहे. आज एका वेगळ्याच भावनिक वातावरणात हा कार्यक्रम पार पडतोय. अजितदादांना जसा महाराष्ट्र अपेक्षित होता तसा महाराष्ट्र उभा करण्यासाठी आपले सर्व कार्यकर्ते कटिबद्ध राहतील असा मला विश्वास आहे”, असे सुनेत्रा पवार म्हणाल्या.



























































