
वानखेडे स्टेडियमवर गुरुवारी झालेल्या पहिल्या उपांत्य सामन्यात कर्णधार शिवम दुबेने आपल्या नेतृत्वाला साजेशी खेळी करत आर्क्स अंधेरी संघाला ‘Mumbai T20 League 2026’ च्या अंतिम फेरीत पोहोचवले. आकाश टायगर्स मुंबई वेस्टर्न सबर्ब्सविरुद्ध झालेल्या या अटीतटीच्या सामन्यात अंधेरीने 5 गडी राखून दणदणीत विजय मिळवला. गोलंदाजांच्या शिस्तबद्ध कामगिरीमुळे आकाश टायगर्सला 150 धावांवर रोखल्यानंतर, अंधेरीने दुबेच्या स्फोटक फलंदाजीच्या जोरावर 9 चेंडू राखूनच विजयाचे लक्ष्य गाठले.
आकाश टायगर्स मुंबई वेस्टर्न सबर्ब्सने दिलेल्या 151 धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना अंधेरीची सुरुवात खराब झाली. मुशीर खान खाते न उघडताच बाद झाला. त्यानंतर दिव्यांश सक्सेना (34) आणि अर्जुन तेंडुलकर (13) यांनी डाव सावरण्याचा प्रयत्न केला, पण शम्स मुलाणीने लागोपाठ दोन धक्के देत टायगर्सला सामन्यात परत आणले. पाठोपाठ अजित यादवने 13 व्या षटकात प्रसाद पवार (26) आणि प्रग्नेश कानपिल्लेवार (18) या दोघांना बाद केल्यामुळे अंधेरीची अवस्था 5 बाद 92 अशी बिकट झाली होती. मात्र, कठीण प्रसंगी कर्णधार शिवम दुबेने सामन्याची सूत्रे हाती घेत अवघ्या 26 चेंडूत 5 षटकार आणि 1 चौकारासह नाबाद 45 धावा ठोकल्या. त्याने गौरव जठारसोबत (नाबाद 11) 59 धावांची अभेद्य भागीदारी करत संघाला दिमाखात फायनलचे तिकीट मिळवून दिले.
तत्पूर्वी, नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करणाऱ्या आकाश टायगर्सची सुरुवात वेगवान झाली. कर्णधार सरफराज खानने 17 चेंडूत 34 धावा तर सलामीवीर जय बिस्ताने 35 धावा केल्या. मात्र, मधल्या फळीत ठराविक अंतराने विकेट्स गेल्यामुळे टायगर्सला मोठी धावसंख्या उभारता आली नाही आणि त्यांचा डाव 20 षटकांत 7 बाद 150 धावांवर मर्यादित राहिला. अंधेरीकडून आशुतोष घागरेने 21 धावांत 2 बळी घेतले, तर अर्जुन, शिवम, अजय मिश्रा, मुशीर आणि प्रसून सिंग यांनी प्रत्येकी एक विकेट घेतली. आता शनिवारी (13 जून 2026) होणाऱ्या अंतिम सामन्यात अंधेरीचा सामना नॉर्थ मुंबई पँथर्स आणि एमएससी मराठा रॉयल्स यांच्यातील दुसऱ्या उपांत्य फेरीच्या विजेत्याशी होईल.































































