
मुलाच्या लग्नाची तयारी अंतिम टप्प्यात आली असताना अचानक लागलेल्या भीषण आगीने एका कुटुंबाच्या आनंदावर विरजण घातल्याची घटना ढाणकी येथील अमृतराव चंद्रे चौक परिसरात बुधवारी (१० जून) रात्री घडली. गॅस सिलिंडरला आग लागल्याने घरातील लग्नाचे साहित्य, कपडे, दागदागिने आणि संसारोपयोगी वस्तू जळून खाक झाल्या असून लाखो रुपयांचे नुकसान झाले आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, शेख आलम शेख हुसेन यांच्या मुलाचा विवाह १२ जून रोजी होणार असल्याने घरात लग्नाची लगबग सुरू होती. नातेवाईकांची ये-जा, खरेदी केलेल्या वस्तूंची जुळवाजुळव आणि सोहळ्याची तयारी सुरू असतानाच रात्री सुमारे ९ वाजताच्या सुमारास घरातील गॅस सिलिंडरने अचानक पेट घेतला.
अवघ्या काही क्षणांतच आगीने रौद्ररूप धारण केले. घरातील सदस्यांनी जीव वाचवण्यासाठी बाहेर धाव घेतली. मात्र तोपर्यंत आगीने संपूर्ण घराला वेढा घातला होता. लग्नासाठी खरेदी केलेले नवरा-नवरीचे कपडे, दागदागिने, फर्निचर, बेड, सोफा तसेच इतर संसारोपयोगी साहित्य आगीत भस्मसात झाले.
घटनेची माहिती मिळताच परिसरातील नागरिक आणि युवकांनी घटनास्थळी धाव घेतली. पाण्याचे हंडे व उपलब्ध साधनसामग्रीच्या मदतीने आग विझविण्याचा प्रयत्न करण्यात आला. मात्र आगीची तीव्रता मोठी असल्याने सुरुवातीचे प्रयत्न अपुरे ठरले.
दरम्यान, ढाणकी पोलीस ठाण्याचे ठाणेदार पांडुरंग शिंदे यांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली. त्यांनी सहकारी कर्मचाऱ्यांसह आग नियंत्रणात आणण्याचा प्रयत्न केला. नगराध्यक्ष अर्चना वासमवार यांनीही तत्काळ उमरखेड नगरपालिकेशी संपर्क साधून अग्निशामक दलाची गाडी बोलावून घेतली. उमरखेडहून अग्निशामक वाहन दाखल झाल्यानंतर आगीवर नियंत्रण मिळवण्यात यश आले.
विशेष म्हणजे, याच दिवशी सकाळी शहरातील एका व्यापारी गोदामालाही आग लागून लाखो रुपयांचे नुकसान झाले होते. त्यामुळे एकाच दिवशी घडलेल्या दोन आगीच्या घटनांनी ढाणकी शहरात खळबळ उडाली आहे.
अग्निशमन व्यवस्थेवर प्रश्नचिन्ह
या घटनेनंतर ढाणकी नगरपंचायतीच्या अग्निशमन व्यवस्थेवर नागरिकांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. नगरपंचायतीकडे अग्निशामक वाहन उपलब्ध असतानाही ते कार्यान्वित नसल्याने आणीबाणीच्या प्रसंगी स्थानिकांना मदत मिळत नसल्याचा आरोप करण्यात येत आहे. उमरखेडहून अग्निशामक वाहन येईपर्यंत मोठे नुकसान झाल्याने नागरिकांमधून संताप व्यक्त केला जात आहे.
मुख्याधिकाऱ्यांचे स्पष्टीकरण
“अग्निशामक वाहनासाठी चालक व आवश्यक कर्मचाऱ्यांच्या भरतीसाठी दोन वेळा जाहिरात देण्यात आली होती. मात्र प्रतिसाद न मिळाल्याने भरती प्रक्रिया पूर्ण होऊ शकली नाही. लवकरच पुन्हा भरती प्रक्रिया राबविण्यात येईल आणि मनुष्यबळ उपलब्ध होताच अग्निशमन सेवा सुरू करण्यात येईल.” – विश्वाभर राणे, मुख्याधिकारी, नगरपंचायत ढाणकी






























































