
आम आदमी पार्टीने व्यावसायिक जहाजांवर झालेल्या हल्ल्यातील हिंदुस्थानी खलाशांच्या मृत्यूवरून पंतप्रधान नरेंद्र मोदींवर जोरदार हल्लाबोल केला आहे. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचे आभार मानणारा संदेश दिल्याबद्दल आपने पंतप्रधानांना लक्ष्य केले आहे. पंतप्रधानांना ट्रम्प यांचे आभार मानणे योग्य वाटले, मात्र होर्मुझ क्षेत्रात व्यावसायिक जहाजांवर झालेल्या हल्ल्यांमधील हिंदुस्थानी खलाशांच्या मृत्यूवर त्यांनी मौन बाळगले आहे, अशी टीका आपने केली आहे.
आपचे राष्ट्रीय संयोजक अरविंद केजरीवाल म्हणाले आहेत की, जेव्हा हिंदुस्थानी नागरिकांनी आपला जीव गमावला आहे, तेव्हा पंतप्रधान नेमके कोणत्या गोष्टीसाठी डोनाल्ड ट्रम्प यांना धन्यवाद देत आहेत? ज्या जहाजांवर हिंदुस्थानी होते त्या जहाजांवर हल्ला करण्यासाठी आणि हिंदुस्थानी नागरिकांचे प्राण घेण्यासाठी पंतप्रधान मोदी हे ट्रम्प यांचे आभार मानत आहेत का? आता ही परिस्थिती आपल्या देशासाठी अत्यंत लाजिरवाणी झाली असल्याचे केजरीवाल म्हणाले. तसेच पंतप्रधानांनी हिंदुस्थानचे सार्वभौमत्व, अभिमान आणि नागरिकांचे प्राण पूर्णपणे ट्रम्प यांच्या स्वाधीन केले असून ट्रम्प यांना आपल्या देशासोबत आणि आपल्या लोकांशी मनमानी करण्याची परवानगी अजिबात दिली जाऊ शकत नाही, असेही ते म्हणाले.
यादरम्यान पक्षाचे राष्ट्रीय माध्यम प्रभारी अनुराग ढांडा यांनीही सरकारवर निशाणा साधला. ते म्हणाले की, गेल्या तीन दिवसांपासून अमेरिका होर्मुझमध्ये व्यावसायिक जहाजांवर हल्ला करत आहे आणि यात तीन हिंदुस्थानी खलाशांनी आधीच आपला जीव गमावला आहे. असे असतानाही हिंदुस्थानी सरकार अमेरिकेसमोर नतमस्तक आहे. सरकारकडे आभार व्यक्त करणारे संदेश पोस्ट करण्यासाठी वेळ आहे, पण हिंदुस्थानींच्या मृत्यूवर शोक व्यक्त करण्यासाठी काही शब्द लिहिण्याचीही त्यांच्यात हिंमत नाही.




























































