
वेरूळ येथील शिक्षक सुरेश रूपचंद बोरसे यांच्या मृत्यू प्रकरणात पोलिसांनी चार जणांना अटक केली आहे. यापैकी एक विधिसंघर्षग्रस्त बालक असल्याचे सांगण्यात आले. वाळूमाफियांची गँग सोबत घेऊन आरोपीला शोधण्याची नौटंकी करून पोलीस खात्याच्या अब्रुची लक्तरे काढणारे फौजदार एकनाथ नागरगोजे मात्र आपल्याच खात्याच्या मेहेरबानीने मोकाट आहेत.
वैजापूर तालुक्यातील धोंदलगाव येथील संदीप माधव आवारे आणि रवींद्र रखमाजी आवारे यांच्यात संपत्तीवरून वाद आहे. या वादातून काही दिवसांपूर्वी रवींद्र आवारे याच्यावर प्राणघातक हल्ला करण्यात आला होता. या प्रकरणात तीन जणांविरूद्ध दाखल करण्यात आला. यापैकी दोघांना अटक करण्यात आली तर तिसरा आरोपी संदीप आवारे हा फरार होता. संदीप हा वेरूळ येथे नातलगाकडे लपला असल्याची टिप पोलिसांना मिळाली. त्यावरून मध्यरात्री फौजदार एकनाथ नागरगोजे, कॉन्स्टेबल वाल्मीक बनगे हे खासगी गाडीतून वेरूळ येथे आले. विशेष म्हणजे फिर्यादी रवींद्र आवारेही आपल्या गँगला सोबत घेऊन पोलिसांसोबत आला. अचानक पोलीस घरात घुसल्यामुळे एकच गोंधळ उडाला, हे पाहून तेथून जाणारे सुरेश बोरसे यांनी पोलिसांना हटकले. बोरसे यांनी हटकताच पोलीस आणि वाळूमाफियांनी त्यांना लाथाबुक्क्यांनी मारहाण केली. यातच त्यांचा मृत्यू झाला.
शिवसेना नेते आमदार अंबादास दानवे, तालुकाप्रमुख राजू वरकड, शहरप्रमुख मुकेश मालोदे यांच्या नेतृत्वाखाली पाच तास रास्ता रोको करण्यात आल्यानंतर पोलिसांनी या प्रकरणात गुन्हा नोंदवला. सुरेश बोरसे यांची पत्नी अनिता यांनी केलेल्या तक्रारीवरून पोलिसांनी सात अनोळखी व्यक्तींवर गुन्हा दाखल केला होता. आज या प्रकरणात रवींद्र रखमाजी आवारे (३४), ओंकार बाबुराव चौधरी (२४), बाळू विश्वनाथ डमाळे (४२), सोपान अशोक चोथे (२७) तसेच एका विधिसंघर्षग्रस्त बालकाला अटक करण्यात आल्याचे अपर पोलीस अधीक्षक प्रशांत स्वामी यांनी सांगितले.
पोलीस अधीक्षकसाहेब हे बघा… हिंमत असेल तर कारवाई करा
शिक्षक सुरेश बोरसे यांचा पोलीस आणि वाळूमाफियांच्या अमानुष मारहाणीत मृत्यू झाला. या घटनेनंतर पोलीस निरीक्षक सत्यजित ताईतवाले हे खुनाच्या गुन्ह्यात शिक्षा भोगून आलेला आरोपी तसेच वाळूमाफिया रवींद्र आवारे याला पेढा भरवतानाचे छायाचित्र सोशल मीडियावर व्हायरल झाले. या छायाचित्राने वैजापूर पोलीस आणि वाळूमाफियांचे संबंध किती मधुर आहेत, हे जगासमोर आले. पोलीस निरीक्षक सत्यजित ताईतवाले, फौजदार एकनाथ नागरगोजे, कॉन्स्टेबल वाल्मीक बनगे यांनी पोलीस खात्याची अब्रु धुळीला मिळवली आहे. ग्रामीणचे पोलीस अधीक्षक प्रकाश जाधव यांनी या बेशिस्त, बेजबाबदार पोलीस अधिकाऱ्यांवर कारवाई करण्याची हिंमत दाखवावी, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.
नागरगोजे, बनगेवर कारवाई का नाही?
पोलीस खात्याच्या सर्व नियमांचा लिलाव करून आरोपीच्या शोधासाठी फिर्यादीला घेऊन जाणारे फौजदार एकनाथ नागरगोजे आणि त्यांच्यासोबत असलेले कॉन्स्टेबल वाल्मीक बनगे हे दोघेही आपल्याच खात्याच्या मेहेरबानीने मोकाट फिरत आहेत. आरोपीचा शोध घेण्यासाठी वेरूळला जात असल्याची नोंद ठाणे डायरीत करण्यात आली नाही, तेथील स्थानिक पोलिसांना कल्पना देण्यात आली नाही. पोलिसांच्या गाडीत हे पथक गेले नाही, तर वाळूमाफियाच्या गाडीत गेले. मुळात सुरेश बोरसे यांना कोणत्या अधिकारात पोलिसांनी मारहाण केली? बोरसे यांच्या मुलीने गाडी अडवली नसती तर पोलीस आणि वाळूमाफियांनी तेथेच त्यांचा जीव घेतला असता. पोलीस खात्याच्या अब्रुचे धिंडवडे निघत असतानाही नागरगोजे आणि बनगे या दोघांवरही किरकोळ कारवाईचा साधा ओरखडाही उठला नाही.






























































