
निकृष्ट दर्जाचा युरिया तयार करणाऱ्या महाड एमआयडीसीतील एका कंपनीवर कृषी विभागाने गुन्हा दाखल केला आहे. खरीप हंगामाच्या तोंडावर शेतकऱ्यांना दर्जेदार खते उपलब्ध व्हावीत यासाठी कृषी विभागाने तपासणी मोहीम तीव्र केली आहे. या मोहिमेत महाड एमआयडीसीतील खत उत्पादक कंपनीतील अनियमितता उघडकीस आल्याने हा कारवाईचा बडगा उगारण्यात आला आहे.
कृषी विभागाच्या गुणनियंत्रण पथकाने महाड एमआयडीसी परिसरातील सिद्धार्थ कलरकेम लिमिटेड या कंपनीतून युरिया खताचा नमुना घेतला होता. प्रयोग शाळेच्या अहवालात नमुन्याबाबत नियमबाह्य बाबी आढळून आल्या. याप्रकरणी महाडचे कृषी अधिकारी सूरजकुमार लांडगे यांच्या फिर्यादीवरून एमआयडीसी महाड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. कंपनीवर अत्यावश्यक वस्तू अधिनियम १९५५ आणि खत नियंत्रण आदेश १९८५ अंतर्गत कारवाई करण्यात आली आहे.
जिल्हा गुणनियंत्रण निरीक्षक बुद्धभूषण मुनेश्वर आणि कृषी अधिकारी सूरजकुमार लांडगे यांनी ही कारवाई केली. कृषी विभागाचे संचालक सुनील बोरकर, विभागीय कृषी सहसंचालक शिवाजी आमले, मुख्य गुणवत्ता नियंत्रण अधिकारी प्रवीण देशमुख, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी वंदना शिंदे आणि तंत्र अधिकारी अजिंक्य पवार यांच्या मार्गदर्शनाखाली ही मोहीम राबवण्यात आली.
खरीप हंगामात शेतकऱ्यांची फसवणूक होऊ नये, निकृष्ट अथवा नियमबाह्य खते बाजारात येऊ नयेत यासाठी अशा तपासण्या अधिक तीव्र करण्यात येणार असल्याचा इशारा कृषी विभागाने दिला आहे. शेतकऱ्यांच्या हिताशी तडजोड करणाऱ्यांवर कठोर कारवाई सुरूच राहणार असल्याचेही विभागाने स्पष्ट केले आहे.


























































