
अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी इराणसोबत शांतता करार पूर्ण झाल्याची आणि होर्मुझची सामुद्रधुनी हा महत्त्वाचा सागरी मार्ग तात्काळ खुला करण्याची घोषणा केली आहे. यानंतर जागतिक बाजारात कच्च्या तेलाच्या किमतीत मोठी घसरण पाहायला मिळाली. सोमवारीआशियाई बाजारात व्यवहार सुरू होताच कच्च्या तेलाचे दर जवळपास 5 टक्क्यांनी कोसळले. त्यामुळे आगामी काळामध्ये युद्धामुळे वाढलेल्या पेट्रोल-डिझेल, एलपीजीच्या किमती कमी होण्याची शक्यता निर्माण झाली आहे.
इराण आणि अमेरिकेमध्ये चार महिन्यांपासून युद्ध सुरू होते. त्यामुळे जगाच्या तेल वाहतुकीसाठी महत्त्वाचा मानला जाणारा होर्मुझची सामुद्रधुनी हा मार्ग बंद झाला होता. याच मार्गातून जागतिक तेलाच्या एकूण पुरवठ्यापैकी 20 टक्के पुरवठा होत होता. आता हा मार्ग पुन्हा सुरू झाल्याने जागतिक तेल पुरवठ्यावरील संकट दूर होण्याची शक्यता निर्माण झाली आहे.
कच्च्या तेलाच्या किमती 81 डॉलरवर
सोमवारी सुरुवातीच्या व्यवहारात कच्च्या तेलाच्या किमती 3.5 टक्क्यांपेक्षा जास्त घसरल्या आणि प्रति बॅरल 85 डॉलरच्या खाली आल्या. तर अमेरिकन कच्च्या तेलाच्या दरात तब्बल 5 टक्के पर्यंत घसरण झाली आहे. त्यामुळे कच्च्या तेलाचा दर प्रति बॅरल 80 डॉलरच्या खाली जाण्याच्या उंबरठ्यावर आहे.
ट्रम्प यांनी केली शांतता कराराची घोषणा
इराणसोबतचा शांतता करार आता पूर्ण झाला असून होर्मुझची सामुद्रधुनी तात्काळ खुली करण्यात येत आहे. तसेच अमेरिकेच्या नौदलाने या मार्गावर लावलेली नाकेबंदी देखील हटवण्यात येत आहे. जगभरातील जहाजांनो, तुमचे इंजिन सुरू करा! तेलाचा प्रवाह वाहू द्या! अशी पोस्ट अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी केली आहे.

19 जूनला स्वाक्षऱ्या
दरम्यान, या ऐतिहासिक शांतता करारावर 19 जून रोजी स्वित्झर्लंडमध्ये स्वाक्षऱ्या केल्या जातील, अशी माहिती पाकिस्तानचे पंतप्रधान शाहबाज शरीफ यांनी दिली.
पेट्रोल-डिझेल, एलपीजीच्या किंमती कमी होणार?
होर्मुझची सामुद्रधुनी खुली झाल्यामुळे व्यापारी जहाजांची वाहतूक लवकरच पूर्ववत होईल. यामुळे बहुतांश आशियाई देशांना आखाती देशांतून पुन्हा एकदा खनिज तेलाची आयात सुरू करता येणार आहे. तसेच या महिन्याच्या सुरुवातीलाच ओपेक देशांनी जुलै महिन्यापासून त्यांच्या तेल उत्पादन कोट्यात वाढ करण्याची घोषणा केली आहे. त्यामुळे बाजारात पुरवठा आणखी वाढणार आहे. इराण युद्धाच्या भरात कच्च्या तेलाचे दर प्रति बॅरल 125 डॉलर या सर्वोच्च पातळीवर पोहोचले होते. मात्र, एप्रिल महिन्यात झालेली युद्धबंदी आणि त्यानंतर शांतता कराराच्या शक्यतेमुळे तेलाच्या किमती पुन्हा नियंत्रणात येण्यास मदत झाली आहे. त्यामुळे आगामी काळात पेट्रोल-डिझेल, एलपीजीच्या किंमती कमी होण्याची शक्यता आहे.
























































