Ratnagiri News – रूढी-परंपरांचे माहेरघर ठरलेले चव्हाणवाडी; गावात अजूनही जपली जाते सामूहिक शेतीची परंपरा

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

आधुनिकतेच्या वाढत्या प्रभावामुळे ग्रामीण भागातील अनेक पारंपरिक प्रथा, रूढी आणि सामूहिक उपक्रम काळाच्या ओघात लोप पावत असताना राजापूर तालुक्यातील ग्रामपंचायत निवेली कार्यक्षेत्रातील चव्हाणवाडी हे गाव आजही आपल्या परंपरांचे जतन करत आदर्श निर्माण करत आहे. गावातील ग्रामस्थांनी गेली अनेक वर्षे सामूहिक शेतीची परंपरा अखंडपणे जपली असून सामाजिक एकोपा आणि कृषी संस्कृतीचे अनोखे दर्शन येथे घडते.

सर्वत्र भातशेतीचे क्षेत्र कमी होत असताना चव्हाणवाडी मात्र याला अपवाद ठरली आहे. गावातील ग्रामस्थ एकदिलाने एकत्र येऊन सार्वजनिक शेती करतात. त्याचबरोबर वैयक्तिक शेतीलाही तेवढेच महत्त्व देण्यात येते. सुमारे १०३ कुटुंबे असलेल्या या गावातील तब्बल ९० टक्के कुटुंबे आजही भात आणि नाचणीची शेती करीत आहेत.

चव्हाणवाडीची विशेष ओळख म्हणजे येथील सामूहिक शेती. या शेतीतून उत्पादित होणारा तांदूळ गावातील पारंपरिक शिमगा उत्सवातील सार्वजनिक निवेद (पोस्त) तयार करण्यासाठी वापरला जातो. त्यामुळे या उपक्रमाला केवळ कृषीच नव्हे तर धार्मिक आणि सांस्कृतिक महत्त्वही प्राप्त झाले आहे. ग्रामस्थांच्या मते, सामूहिक श्रमातून पिकविलेल्या धान्याची चव आणि समाधान काही वेगळेच असते.

गावातील कोणताही सार्वजनिक उत्सव पारंपरिक पद्धतीने आणि सर्वांच्या सहभागातून साजरा केला जातो. रूढी, परंपरा, चालीरीती आणि सामाजिक एकोप्याचा वारसा जपत चव्हाणवाडीने परिसरात स्वतंत्र ओळख निर्माण केली आहे. बदलत्या काळातही आपल्या सांस्कृतिक मुळांशी घट्ट नाते जपणारे हे गाव ग्रामीण महाराष्ट्रासाठी प्रेरणादायी ठरत आहे.