
वडिलांसाठी आणलेल्या औषधांमध्ये कालबाह्य (Expired) गोळ्या दिल्याचा धक्कादायक प्रकार नांदेडमध्ये उघडकीस आला आहे. याप्रकरणी जागरूक ग्राहकाने थेट अन्न व औषध प्रशासन (FDA) आयुक्त तुकाराम मुंढे यांच्याकडे ईमेलद्वारे तक्रार नोंदवली. या तक्रारीची गंभीर दखल घेत आयुक्त मुंढेंच्या आदेशानुसार अन्न व औषध प्रशासन विभागाने आज (15 जून 2026) दुपारी नांदेड येथील ‘तोष्णीवाल मेडिकल’वर धडक कारवाई करत दुकान तात्काळ सील केले आहे. तुकाराम मुंढे यांच्या या तत्पर आणि धडक कारवाईमुळे जिल्ह्यातील अवैध व निष्काळजीपणे व्यवसाय करणाऱ्या मेडिकल दुकानदारांचे धाबे दणाणले आहेत.
नायगाव तालुक्यातील रहिवासी हनुमंत वानोळकर हे आज आपल्या 90 वर्षीय वडिलांसाठी मधुमेहाच्या गोळ्या खरेदी करण्यासाठी तोष्णीवाल मेडिकलवर आले होते. गोळ्या विकत घेऊन घरी परतल्यानंतर, त्यांनी गोळ्यांचे पाकीट तपासले असता त्यावर मुदत संपण्याची तारीख डिसेंबर 2025 अशी नोंद असल्याचे त्यांच्या निदर्शनास आले. वडिलांच्या जिवाशी खेळ होऊ शकतो ही बाब लक्षात येताच, वानोळकर यांनी कोणतीही वेळ न दवडता थेट एफडीए आयुक्त तुकाराम मुंढे यांना ईमेल पाठवून पुराव्यांसह तक्रार दाखल केली.
ग्राहकाचा ईमेल मिळताच आयुक्त तुकाराम मुंढे यांनी अत्यंत तत्परता दाखवत नांदेडच्या अन्न व औषध प्रशासनाला तात्काळ कारवाईचे आदेश दिले. त्यानुसार, सहायक आयुक्त अशोक राठोड यांच्या नेतृत्वाखालील पथकाने औषध दुकानावर छापा टाकला. प्राथमिक तपासणीतच त्रुटी आढळल्याने अधिकाऱ्यांनी तात्काळ ‘तोष्णीवाल मेडिकल’ला सील ठोकले. अन्न व औषध प्रशासनाकडून या दुकाची सखोल तपासणी सुरू असून, प्राथमिक तपासणीत दुकानात कालबाह्य झालेल्या इतरही अनेक गोळ्या व औषधे आढळून आल्याची विश्वासनीय माहिती मिळाली आहे. दरम्यान, “नजरचुकीने या गोळ्या दिल्या गेल्या” असा बचाव तोष्णीवाल मेडिकलच्या वतीने करण्यात येत आहे.
अन्न व औषध प्रशासनाने या प्रकरणी कठोर भूमिका घेतली असून, तोष्णीवाल मेडिकलवर ‘औषधे व सौंदर्य प्रसाधने कायदा 1940 आणि नियम 1945’ अंतर्गत कायदेशीर कारवाई सुरू केली आहे. दुकानातील संपूर्ण स्टॉकची तपासणी अद्याप सुरू आहे. एका जागरूक नागरिकाने दाखवलेले प्रसंगावधान आणि आयुक्त तुकाराम मुंढे यांनी घेतलेला तात्काळ निर्णय यामुळे नांदेडमधील औषध विक्रेत्यांमध्ये एकच खळबळ उडाली आहे. ग्राहकांच्या आरोग्याशी खेळ करणाऱ्यांची गय केली जाणार नाही, असाच इशारा या कारवाईतून देण्यात आला आहे.




























































