
>> डॉ. आशीष लोहे
मराठीमध्ये एक म्हण आहे, ‘आई जेवू घालीना आणि बाप भीक मागू देईना’ अशी अवस्था संत्रा उत्पादक शेतकऱ्यांची मागच्या काही वर्षांमध्ये झाली आहे. फक्त आईबापाची जागा आता सरकार आणि निसर्ग आलटून पालटून घेत असतो. बाकी या दोघांच्या मध्ये अडकलेला संत्रा उत्पादक शेतकरी मात्र कायम तसाच आहे. भारतात जवळपास पाच लाख हेक्टर जमिनीवर संत्र्याची लागवड झाली आहे.
महाराष्ट्र, मध्य प्रदेश आणि इतर काही राज्यांमध्ये संत्र्याची लागवड केली जाते. त्यातून जवळपास 13 लाख टन संत्रा उत्पादन दरवर्षी घेतले जाते आणि त्यातील 60 टक्के संत्रा हा फक्त महाराष्ट्रात होतो. तो जवळपास सात लाख टन आहे. अमरावती जिल्ह्यातील वरूड आणि मोर्शी तालुका हा विदर्भातील कॅलिफोर्निया या नावाने प्रसिद्ध होण्यासाठी एकमेव कारण म्हणजे संत्र्याचे उत्पादन. एकेकाळी हमखास उत्पादन आणि नगदी पीक यामुळे या भागामध्ये बरीच सुबत्ता आली होती. परंतु गेल्या काही वर्षांमध्ये उत्पादनापासून तर विक्रीपर्यंत अनेक समस्यांना शेतकऱ्यांना सामोरे जावे लागत आहे. हवामानातील बदल, संत्राच्या झाडावर येणारे रोग, वाढता उत्पादन खर्च, अस्थिर, बेभरवशाचा बाजार आणि अपुरी शासकीय मदत यामुळे संत्रा उत्पादक शेतकरी अडचणीत सापडला आहे.
संत्र्याची बाग तयार करायला साधारणतः पाच ते सहा वर्षे लागतात आणि दहा वर्षांनंतर ती संत्र्याची बाग पूर्ण क्षमतेने संत्रा उत्पादन करते. सुरुवातीची पाच वर्षे त्यातून कोणतेही उत्पन्न निघत नाही. संत्रा हे फळ साधारणतः दहा ते अकरा महिने शेतकऱ्याला सांभाळावे लागते. इतर पिकं ही तीन किंवा चार महिन्यांची असतात. त्यामुळे त्यांना पाणी कमी लागते. परंतु संत्र्याच्या बागांना नियमित सिंचनाची आवश्यकता असते. अनेक भागांमध्ये भूजल पातळी खालावली असून विहिरी आणि बोरवेल कोरड्या पडलेल्या आहेत. त्यामुळे पाण्याअभावी झाडे मरत आहेत आणि फळाची गुणवत्ता कमी होत आहे. ठिबक सिंचनाचा वापर वाढत असला तरी त्यासाठी लागणारा खर्च हा छोटय़ा शेतकऱ्यांसाठी अडचणीचा ठरतो.
हवामानातील बदल हे संत्रा उत्पादन कमी होण्यास अतिशय महत्त्वाचे कारण आहे. संत्रा अतिशय संवेदनशील पीक आहे. तापमानात अचानक बदल झाला, अवकाळी पाऊस आला, गारपीट झालं की त्याचा विपरीत परिणाम संत्रा उत्पादनावर होतो. तीव्र उष्णतेमुळे संत्रं गळून जातात .
मागील काही वर्षांमध्ये संत्र्याच्या झाडावर अनेक रोग जात आहेत. बुरशीजन्य रोगांमुळे संत्र्याचे नुकसान होत आहे. त्याचे योग्य वेळी निदान होत नाही. शेतकऱ्याला त्यावर योग्य मार्गदर्शन मिळत नाही, मग तो कृषी सेवा केंद्रामध्ये धाव घेतो. कीटकनाशक कंपन्यांचे प्रतिनिधी आणि कृषी सेवा केंद्राचे चालक ज्या पद्धतीने मार्गदर्शन करतील अशी औषधे आणि कीटकनाशके फवारतो आणि यामुळे त्याचा खर्च हा सतत वाढत जातो. खते, औषधी, मजुरी, वीज, सिंचनाच्या सुविधा या सतत वाढत आहे. संत्र्याच्या झाडाची देखभाल ही वर्षभर करावी लागते. त्यामुळे उत्पादन खर्च हा वाढतच आहे. एका एकरामध्ये साधारणतः 100 झाडे असतात या 100 झाडांची वर्षभर देखभाल करण्याचा (ज्यामध्ये फवारे, मशागत, खते, सिंचन या सगळ्या गोष्टी) एक लाख रुपये खर्च येतो. त्यामुळे एकरी एक लाख रुपये खर्च हा फक्त निगा राखण्यासाठी जातो, म्हणजे दहा एकर जर संत्र्याची बाग असेल तर त्याला दहा लाख रुपये दरवर्षी खर्च येतो आणि उत्पादनाचा विचार केला तर एकरामध्ये आठ ते दहा टन संत्रा येऊ शकतो. जर भाव निदान 40 रुपये किलो मिळाला तर त्याला खर्च वजा जाऊन पैसे शिल्लक राहतात, परंतु मागील काही वर्षांमध्ये संत्र्याचे भाव हे 15 ते 20 रुपये किलो अशा कमी दरामध्ये विकावा लागला. याशिवाय अनियमित वातावरण बदलामुळे त्याचे उत्पादनही कमी झाले. हे सतत चक्र काही वर्षे चालू राहल्यामुळे संत्र्याचे पीक त्यांना परवडत नाही. व्यापारी आणि दलाल जे म्हणतील तोच भाव. शेतकऱ्याला त्याच्या उत्पादनासाठी कोणताही हमीभाव नाही. त्यामुळे संत्रा विक्रीचा हा सर्व व्यवहार आंधळेपणाने चालतो.
संत्र्याच्या झाडांची छाटणी, खुरपी, फवारणी, ओलीत करण्यासाठी मजुरांची गरज असते, परंतु मजूर मिळत नाही. परिणामी मजुरीचा दर वाढल्यामुळे उत्पादन खर्च आणखी वाढतो. हा प्रश्न किचकट असला तरी आणि यावर रामबाण उपाय नसले तरी काही उपाययोजना करणे शक्य आहे.
वीजपुरवठा- शेतकऱ्याला दिवसा पूर्ण क्षमतेने निदान आठ तास सतत वीजपुरवठा होणे अतिशय आवश्यक आहे. कारण संत्रा पिकाला पाणी पाहिजे असते. ठिबक सिंचनाच्या सोयी करणे अतिशय आवश्यक आहे.
रोग आणि कीड नियंत्रणासाठी सतत आणि बांधावर मार्गदर्शन देण्याची गरज आहे. योग्य कीटकनाशके आणि फवारणी यासाठी त्यांना सतत मार्गदर्शनाची गरज भासते. त्यामुळे ग्रामीण भागामध्ये आरोग्याच्या क्षेत्रामध्ये ‘आशा वर्कर’ ज्याप्रमाणे काम करतात त्याचप्रमाणे दर 100 शेतकऱ्यांच्या मागे एक कृषी मित्र असावा. संत्र्याच्या झाडावर काही रोग येत असेल तर त्या कृषी मित्राने कृषी तज्ञाचा सल्ला घेऊन त्यावर येणाऱ्या उपाययोजना शेतकऱ्यांपर्यंत पोहोचाव्या. अशा पद्धतीने कृषी विद्यापीठातील कृषी तज्ञ आणि शेतकरी यांच्यामध्ये जी दरी पडलेली आहे ती या ‘कृषी मित्रा’च्या निमित्ताने भरून निघेल आणि शेतकऱ्याला योग्य मार्गदर्शन मिळेल.
संत्र्याचा विमा – संत्रा पिक विमा सुलभ असावा आणि त्याचा भार शेतकऱ्यावर कसा कमी करता येईल याकडे लक्ष देणे गरजेचे आहे. या विमा काढणाऱ्या कंपन्या शेतकऱ्याला भरपाई देण्यामध्ये टाळाटाळ करतात. तापमानाचा ट्रिगर लागूनसुद्धा, पावसाचा ट्रिगर लागूनसुद्धा शेतकऱ्यांना ते भरपाई देत नाहीत. तर त्यासाठी शेतकऱ्याला आंदोलन करावं लागतं. यामुळे पिक विम्याकडे अनेक शेतकरी पाठ फिरवतात आणि पर्यायाने मग नुकसान भरपाई त्यांना मिळत नाही. जर या विमा कंपन्या यांच्यावर सरकारचा अंकुश राहिला तर त्याचा फायदा शेतकऱ्याला होईल.
संत्राच्या व्यापाऱ्यांवर कोणाचेही नियंत्रण उरलेले नाही. त्यामुळे संत्र्याच्या व्यापाराचे नियमन करण्याची गरज आहे. संत्रा व्यापाऱ्यांची नोंदणी करणे आवश्यक आहे. या क्षेत्रामध्ये किती व्यापारी आहेत याची माहिती सरकारला असायलाच पाहिजे. या व्यापाऱ्यांमध्ये काही चुकीच्या बाबी आहेत, ज्या तत्काळ थांबवणे गरजेचे आहे. जसे की शेतकऱ्यांना एक टनामागे एक क्विंटल संत्री फुकट द्यावी लागतात. शंभर कॅरेट संत्रावर दहा कॅरेट फुकट द्यावे लागतात. याला व्यापारी सूट असं म्हणतात. या अशा पद्धतीमुळे शेतकऱ्याचे नुकसान होते. समजा व्यापाऱ्याने एका ठराविक किमतीमध्ये बगीचा विकत घेतला आणि तोडलाच नाही किंवा टाकून दिला, तर याची दाद कुठेही मागता येत नाही. त्यामुळे ग्रामीण भागातील तहसीलदार यांच्या पातळीवर यासाठी काही नियम ठरवून देणे अतिशय आवश्यक झालेले आहे. संत्र्याचा सौदा झाल्यानंतर व्यापाऱ्यांनी शेतकऱ्याला तत्काळ निदान एक तृतीयांश रक्कम दिली पाहिजे आणि उरलेली रक्कम ही संत्र्याची तोड लावण्याचे आधी दिली पाहिजे. जर हा सौदा टणाने किंवा कॅरेटने झाला असेल तर त्याही परिस्थितीमध्ये अंदाजे एक तृतीयांश रक्कम ही सौदा ठरल्याबरोबर दिली गेली पाहिजे आणि उरलेली रक्कम ही संत्रे मोजल्यानंतर शेतकऱ्याला ताबडतोब दिली गेली पाहिजे. आणि असं होत नसेल तर शेतकऱ्याला दाद मागता आली पाहिजे. त्यावर लवकरच निर्णय झाला पाहिजे. कारण शेतकरी कोर्टात जाऊन न्याय मागू शकत नाही.
शेतकऱ्यांना संत्र्याची योग्य कलमे कृषी विद्यापीठांमध्ये संशोधन करून सिडलेस कलमे माफक दरात शेतकऱ्यांना उपलब्ध करून देणे आवश्यक आहे.
मोर्शी तालुक्यातील हिवरखेड येथे जैन प्रकल्प आणि नागपूर मिहानला पतंजली यांचा संत्रा प्रक्रिया उद्योग याचे उद्घाटन होऊन अनेक वर्षे निघून गेली. परंतु हे प्रकल्प अजूनही सुरू झाले नाहीत. महाराष्ट्रातील एकमेव नांदेड येथे संत्रा प्रक्रिया पेंद्र आहे जर संत्रा प्रक्रिया केद्रे वाढली तर संत्र्याला भाव येईल. शालेय पोषण आहारामध्ये संत्र, मोसंबी या फळाचा समावेश केला तर या फळांची मागणी वाढू शकते. कोल्ड स्टोरेज, प्रक्रिया उद्योग, निर्यात सुविधा वाढवणे यासारख्या गोष्टी करणे अतिशय आवश्यक आहे. शेतकरी उत्पादक कंपन्या, सहकारी संस्था यांना राजश्रय देऊन त्यांना बळकट करण्यासाठी प्रयत्न करणे आवश्यक आहे.






























































