
विधान परिषदेच्या सातारा-सांगली मतदारसंघात महायुतीत अंतर्गत वाद उफाळून आला आला आहे. धैर्यशील कदम यांच्या उमेदवारीवरून भाजप आणि शिंदे गटात टोकाचे मतभेद निर्माण झाले आहेत. त्यातच अजित पवार गटाने या निवडणुकीत सध्यातरी तटस्थ राहण्याची भूमिका घेतली आहे. यामुळे भाजप उमेदवार धैर्यशील कदम चांगलेच अडचणीत आले आहेत.
सातारा-सांगली विधान परिषद निवडणुकीत महायुतीकडून भाजपचे धैर्यशील कदम रिंगणात आहेत. मात्र, शिंदे गटाने अद्याप त्यांना स्पष्टपणे पाठिंबा दिलेला नाही. नगरपालिका आणि जिल्हा परिषद निवडणुकांवेळी आम्ही समन्वयाचा प्रयत्न केला, पण भाजपकडून प्रतिसाद मिळाला नाही. आता जी परिस्थिती निर्माण झाली आहे, तिला भाजपलाच सामोरे जावे लागेल, अशी भूमिका शिंदे गटाचे नेते पालकमंत्री शंभुराज देसाई यांनी घेतली आहे.
दगाफटका होण्याच्या भीतीने नगरसेवक अज्ञातस्थळी
या निवडणुकीत भाजपचे धैर्यशील कदम विरुद्ध राष्ट्रवादी कॉँग्रेसचे अभयसिंह जगताप अशी थेट लढत होत आहे. सर्वाधिक मतदार भाजपकडे आहेत. मात्र, दगाफटका होण्याच्या भीतीने भाजपने आपले सर्व नगरसेवक अज्ञातस्थळी पाठविले आहे.
वरिष्ठ नेते अंतिम भूमिका ठरवतील – शंभुराज देसाई
निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शिंदे गटाच्या सर्व नगरसेवक, जिल्हा परिषद सदस्यांची भूमिका जाणून घेतल्यानंतर त्याचा अहवाल पक्षाच्या वरिष्ठ नेतृत्वाकडे पाठवला जाईल. त्यानंतर मुंबईत वरिष्ठ नेते अंतिम भूमिका ठरवतील, असे शंभुराज देसाई यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले.
उमेदवारांशी संपर्क साधू नका – मकरंद पाटील
जोपर्यंत उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्याकडून संदेश मिळत नाही तोपर्यंत राष्ट्रवादीच्या नगरसेवकांनी तटस्थ राहावे. वरिष्ठ नेत्यांचा आदेश आल्यानंतर त्याचे निरोप वैयक्तिक स्तरावर पोहच केले जातील. तोपर्यंत कुणीही उमेदवारांशी संपर्क साधू नये, अशा सूचना मंत्री मकरंद पाटील यांनी दिल्या.




























































