पावसाळी अधिवेशन 22 जूनपासून

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा
vidhan bhavan mumbai

राज्य विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनाला पुढील आठवड्यात 22 जूनपासून सुरुवात होत आहे. तीन आठवडे चालणाऱ्या या अधिवेशनात विधान परिषदेच्या उपसभापतींची निवड केली जाण्याची दाट शक्यता आहे. विधिमंडळाच्या याच अधिवेशनात उपसभापती पदाची निवडणूक व्हावी, असा  शिंदे गटाचा हट्ट आहे. मात्र, यावर भाजपने अद्याप निर्णय घेतला नसल्याचे समजते.

विधान परिषदेच्या माजी उपसभापती डॉ. नीलम गोऱहे यांची विधान परिषद सदस्यत्वाची मुदत 13 मे 2025 रोजी संपली. त्यामुळे  सध्या उपसभापती पद हे रिक्त असून ते भरण्याबाबत पावसाळी अधिवेशनात निर्णय अपेक्षित आहे. विधान परिषदेच्या उपसभापती पदावर शिंदे गटाचा दावा आहे. विधान परिषद सभापती, विधानसभा अध्यक्ष ही दोन्ही पदे भाजपकडे आहेत. तर विधानसभेचे उपाध्यक्षपद राष्ट्रवादी  काँग्रेस अजित पवार गटाकडे आहे. त्यामुळे विधान परिषदेचे उपसभापती पद शिंदे गटाकडे जाण्याची शक्यता आहे या  पदासाठी नीलम गोऱ्हे उतावीळ असल्याची शिंदे गटातच चर्चा आहे.

दरम्यान, पावसाळी अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर आज विधान भवनात संसदीय कामकाज सल्लागार समितीची बैठक झाली. या बैठकीत अधिवेशनाचे कामकाज 10 जुलैपर्यंत चालवण्याचा निर्णय घेण्यात आला. अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी सन 2026-27 या वर्षाच्या पुरवणी मागण्या सादर केल्या जातील. या मागण्यांवर चर्चा होऊन त्या पहिल्या आठवड्यात मंजूर केल्या जातील.

विधान भवन येथे आयोजित बैठकीला विधान परिषदेचे सभापती प्रा. राम शिंदे, विधानसभा अध्यक्ष अॅड. राहुल नार्वेकर, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार, विधानसभा उपाध्यक्ष अण्णा बनसोडे, संसदीय कार्यमंत्री चंद्रकांत पाटील, अन्न आणि नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांच्यासह आमदार सुधीर मुनगंटीवार, दीपक केसरकर, नाना पटोले, जयंत पाटील, आमदार डॉ. नीलम गोऱ्हे, अनिल परब, प्रसाद लाड, हेमंत पाटील, प्रवीण दरेकर, विक्रम काळे, सतेज पाटील, विधिमंडळाचे सचिव जितेंद्र भोळे उपस्थित होते.