
‘वागले की दुनिया’, ‘कुमकुम भाग्य’, ‘दिलवाले दुल्हनिया ले जाएंगे’ यांसारख्या अनेक टीव्ही मालिकांमध्ये व चित्रपटांमध्ये काम करणाऱ्या प्रसिद्ध अभिनेत्री संचिता उगले हिने रविवारी गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना घडली आहे. तिच्या अकाली मृत्यूमुळे गुणी मराठमोळी अभिनेत्री काळाच्या पडद्याआड गेली असून कला विश्वातील तिच्या चाहत्यांना मोठा धक्का बसला आहे. मात्र तिने वयाच्या अवघ्या २२व्या वर्षी आपले आयुष्य का संपवले हे अद्यापी समजले नसून पोलीस आत्महत्येची सखोल चौकशी करीत आहेत.
संचिता उगले ही आपल्या आईवडील व बहिणीसोबत नालासोपाऱ्याच्या आचोळे गावातील साई संतोष या इमारतीत रहात होती. तिची लहान बहीण अंजली व आईवडील दोघेही रविवारी संध्याकाळी घरी नव्हते. त्याच वेळी सायंकाळी ७.३० च्या सुमारास संचिताने बेडरूमधील छताच्या पंख्याला साडीच्या सहाय्याने गळफास घेतला. त्याधी तिने घराचा दरवाजा आतून बंद करून घेतला होता. आईवडील व बहीण घरी येताच त्यांना दरवाजा बंद असल्याचे दिसून आले. वारंवार दरवाजा वाजवूनही कोणी उघडत नव्हते.
सुसाईड नोट आढळली नाही
स्थानिकांच्या मदतीने दरवाजा उघडताच संचिता गळफास घेतलेल्या अवस्थेत दिसून आली. कुटुंबियांनी संचिता हिला तातडीने महानगरपालिकेच्या रुग्णालयात दाखल केले. मात्र तेथील डॉक्टरांनी तिला मृत घोषीत केले. वडील मच्छिंद्र उगले यांनी पोलिसांना ही घटना कळवताच सहाय्यक पोलीस निरीक्षक विनोद वाघ यांच्यासह पोलीस घरी दाखल झाले व त्यांनी घराची पाहणी केली, पण कुठेही त्यांना सुसाईड नोट आढळून आली नाही. तिने आत्महत्या का केली हे तपासाअंतीच स्पष्ट होईल, असे पोलिसांनी सांगितले.
‘छावा’मधील महाराणी ताराबाईंची भूमिका गाजली
मराठमोळी अभिनेत्री संचिता उगले हिने आत्महत्येसारखे टोकाचे पाऊल का उचलले याबाबत अनेक तर्कवितर्क केले जात आहेत. संचिता ही हिंदी टेलिव्हिजनचा लोकप्रिय चेहरा होती. अनेक गाजलेल्या मालिकांमध्ये तिने महत्त्वाच्या भूमिका साकारून आपल्या अभिनयाची छाप पाडली होती. विकी कौशल यांच्या गाजलेल्या ‘छावा’ चित्रपटात तिने बजावलेली महाराणी ताराबाईची भूमिका लोकप्रिय ठरली. त्याशिवाय ‘दिलवाले दुल्हनिया ले जाएंगे’ या हिंदी मालिकेतही तिने आपल्या अभिनयाची चुणूक दाखवली होती.
संशयास्पद इन्स्टा आयडी आणि 14 जून
टीव्ही अभिनेत्री संचिता उगले हिच्या आत्महत्येने कला क्षेत्रात खळबळ उडाली असतानाच तिने आपल्या आत्महत्येसाठी १४ जूनचाच दिवस का निवडला याबाबत अनेक शंका व्यक्त केल्या जात आहेत. संचिताचे शवविच्छेदन सुरू असताना तिच्या भावाला इन्स्टाग्रामवर एक संशयास्पद आयडी आढळून आला. त्यावर तिचा प्रोफाईल फोटो लावण्यात आला आहे. धक्कादायक बाब म्हणजे संचिताने आत्महत्या केली त्या १४ जून या दिवशी त्याच आयडीवरून एक रिल पोस्ट करण्यात आली असल्याची माहिती तिचा चुलतभाऊ आकाश ओगले यांनी दिली. २०२० मध्ये सुशांत सिंग राजपूत यानेही १४ जून या दिवशीच आत्महत्या केली होती. त्यामुळे संचिताच्या आत्महत्येचा संशय आणखी वाढला असून या संपूर्ण प्रकरणाची उच्चस्तरीय सखोल चौकशी करावी, अशी मागणी त्याने पंतप्रधान व राष्ट्रपतींकडे केली आहे.




























































