
<< मंगेश वरवडेकर
मोरोक्कोने ब्राझीलला 1-1 बरोबरीत रोखले! हे वाक्य वाचल्यावर अजूनही अनेक फुटबॉलप्रेमींच्या भुवया उंचावलेल्याच आहेत. कारण त्यांच्या मनात अजूनही फुटबॉलचा नकाशा 1990च्या दशकात अडकलेला दिसतोय. त्या नकाशात ब्राझील म्हणजे फुटबॉलचा राजा आणि मोरोक्को म्हणजे राजाच्या दरबारात उभा असलेला एखादा सामान्य सैनिक. पण त्या सैनिकाने राजाला नमस्कार केला नाही. कारण जग बदललंय. फुटबॉलचा ग्लोब फिरलाय आणि त्या ग्लोबवर मोरोक्को आता एका कोपऱ्यातलं छोटं ठिपकं राहिलेलं नाही. शेवटी मोरोक्को अॅटलस पर्वतरांगामधूनच आलेला सिंह आहे ना. मग कालची बरोबरी ही त्यांची सिंहगर्जनाच होती. पुढे ती प्रतिस्पर्ध्यांना फाडूनही खाईल.
आज मोरोक्को ब्राझीलला रोखतो तेव्हा धक्का बसतो; पण खरा प्रश्न असा आहे की, धक्का बसायला हवा का? कारण चार वर्षांपूर्वी कतारमध्ये मोरोक्कोने जे केलं होतं ते आफ्रिकन फुटबॉलच्या इतिहासात सुवर्णाक्षरांनी लिहिलं गेलंय. त्यांनी युरोपच्या बलाढ्य बेल्जियमला हरवलं. स्पेनला घरी पाठवलं. पोर्तुगालचा पराभव केला आणि उपांत्य फेरी गाठणारा पहिला आफ्रिकन देश बनला.
कतारमध्ये मोरोक्कोची कथा सिंड्रेलासारखी वाटली होती; पण आता लक्षात येतंय की, ती परीकथा नव्हती. ती क्रांतीची सुरुवात होती. भले मोरोक्को 2022 पूर्वी तळागाळाला होता, पण त्यांनी आफ्रिकन संघांविषयी असलेला समज खोडून काढलाय. ते वेगवान असतात, ताकदवान असतात, पण त्यांच्यात शिस्त नसते. प्रतिभा असते, पण डोकं शांत नसतं. ते रागाच्या भरात काहीही करतात. मात्र मोरोक्कोने हा समज आता चक्क गोलपोस्टला बांधून ठेवलाय. त्यांनी जगाला दाखवून दिलं की, आफ्रिकन फुटबॉल फक्त वेगवान नाही, तर बुद्धिमानही आहे. फक्त हृदयाने नाही, तर मेंदूनेही खेळतात. म्हणूनच काल न्यू जर्सीला ब्राझीलविरुद्धचा निकाल हा अपघात नाही. ते त्यांच्या कष्टाचं फळ आहे.
ब्राझील अजूनही फुटबॉलचा बाहुबली आहे. त्यांच्या जर्सीवरचे पाच तारे अजूनही चमकत आहेत. पण त्या ताऱ्यांकडे बघून प्रतिस्पर्धी घाबरण्याचे दिवस आता संपत चाललेत. एकेकाळी ब्राझील मैदानात उतरताच प्रतिस्पर्धी संघाचा अर्धा पराभव मानसिकदृष्ट्या व्हायचा. प्रतिस्पर्धी खचायचे. पेले, झिको, रोमारिओ, रोनाल्डो, रोनाल्डिन्हो, नेमार… ही नावं फक्त खेळाडू नव्हती. ती फुटबॉलची भयकथा होती. मात्र आता मोरोक्कोसारखा संघ म्हणतो, तुमच्याकडे इतिहास आहे, आमच्याकडे वर्तमान आहे आणि वर्तमान अनेकदा इतिहासापेक्षा जास्त धोकादायक असतं.
ब्राझीलच्या प्रत्येक हल्ल्याला मोरोक्कोने छाती पुढे करून रोखलं. प्रत्येक पासवर दबाव आणला. प्रत्येक चेंडूसाठी झुंज दिली. ही बरोबरी नव्हती. पहिला वार मोरोक्कोचा होता. बरोबरी मोरोक्कोची केली. मोरोक्कोला ब्राझीलने रोखलं हे शब्द कानाला खटकत असतील, पण खरे आहेत. हा मोरोक्कोचा एक संदेश होता. जगाला सांगणारा संदेश. फुटबॉलमध्ये आता फक्त युरोप आणि दक्षिण अमेरिकेची मत्तेदारी राहिलेली नाही. आफ्रिका दार ठोठावत नाहीये.आफ्रिका आता थेट दार उघडून आत आली आहे आणि त्या प्रवेशाचं नेतृत्व मोरोक्को करतोय.
ब्राझीलसाठी हा फक्त एक गुण गमावण्याचा प्रसंग असेल. पण मोरोक्कोसाठी? हा त्यांच्या प्रवासाचा पुढचा टप्पा आहे. कारण 2022 मध्ये त्यांनी जगाला आश्चर्यचकित केलं होतं. 2026 मध्ये ते जगाला सवय लावण्याचा प्रयत्न करत आहेत. म्हणून पुढच्या वेळी एखाद्या मथळ्यात ‘मोरोक्कोने ब्राझीलला रोखले’ असं वाचाल तेव्हा आश्चर्य व्यक्त करू नका.
उलट स्वतःलाच विचारा, ब्राझीलला रोखण्याची ताकद मोरोक्कोकडे आहे हे मान्य करायला आपण अजून तयार झालो आहोत का? कारण फुटबॉलच्या नव्या जगात सिंह अजूनही आहे…पण आता वाळवंटातील शिकारीही त्यांच्या डोळ्यात डोळे घालून पाहू लागलेत. तेच दक्षिण अमेरिकन आणि युरोपियन संघांसाठी सर्वात मोठे संकट आहे.



























































