
भाजपा प्रणित सरकारने जाहीर केलेल्या कर्जमाफीतील विचित्र अटी आणि शर्तीच्या विरोधात बीडमध्ये आज मंगळवारी शिवसेना रस्त्यावर उतरली. संतप्त शिवसैनिक आणि शेतकर्यांचा ट्रॅक्टर मोर्चा जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकला. भाजपाचे सरकार फसवे आणि जुमलेबाज असल्याचा आरोप जिल्हाप्रमुख गणेश वरेकर यांनी केला. यावेळी शेतकर्यांच्या हातामध्ये सरकारच्या विरोधातील झळकणारे बॅनर शेतकर्यांचा संताप दर्शवत होते.
सरकारने कर्जमाफी जाहीर केली मात्र कर्जमाफी देताना त्याचा शेतकर्यांना फायदा होवू नये हाच दृष्टीकोण समोर आला. जाचक आणि शर्ती लादल्यामुळे या कर्जमाफीचा शेतकर्यांना फायदा होत नसल्याचे समोर आल्यानंतर शिवसेना नेते अंबादास दानवे यांच्या आदेशावरून संपर्कप्रमुख परशुराम जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्हाप्रमुख गणेश वरेकर यांच्या नेतृत्वात आज जिल्हाधिकारी कार्यालयावर ट्रॅक्टर मोर्चा काढण्यात आला. यावेळी बोलताना जिल्हाप्रमुख वरेकर म्हणाले, घोषणांचा पाऊस पाडून आणि जनतेला गाजर दाखवून सत्तेवर आलेले फडणवीस सरकार फसवे आणि जुमलेबाज आहे. जोपर्यंत तत्कालीन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यासारखी कर्जमाफी होत नाही तोपर्यंत हे आंदोलन चालूच राहणार. आम्ही कायम शेतकर्यांच्या पाठिशी खंबीर शेतकर्यांच्या पाठिशी उभे राहणार असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. यावेळी तालुकाप्रमुख गोरख सिंगण, उपजिल्हाप्रमुख हनुमान जगताप, जिल्हा संघटक रतन गुजर, सहकार सेना जिल्हाप्रमुख गणेश जाधव, माजी तालुकाप्रमुख मदन परदेशी यांनीही शेतकर्यांना मार्गदर्शन केले. यावेळी तालुकाप्रमुख राम नारायण जाधव, जिल्हा सहसचिव श्रीकृष्ण गायके, नंदू येवले, ज्ञानेश्वर काशीद, संदीप भानप, बारीकराव येवले, मुकेश घुमरे आदी उपस्थित होते.


























































