
शिक्षक भरती घोटाळा प्रकरणात अंमलबजावणी संचालनालयाच्या (ईडी) चौकशीनंतर तृणमूल काँग्रेसचे राष्ट्रीय सरचिटणीस अभिषेक बॅनर्जी यांनी भाजपवर जोरदार टीका केली. “माझा गळा चिरला तरी मी झुकणार नाही,” असे ठाम वक्तव्य करत त्यांनी तपास यंत्रणांसमोर भविष्यातही हजर राहण्याची तयारी दर्शवली.
ईडी कार्यालयातून बाहेर आल्यानंतर प्रसारमाध्यमांशी बोलताना बॅनर्जी म्हणाले की, शिक्षक भरती घोटाळा प्रकरणात त्यांची सलग दोन दिवस चौकशी करण्यात आली. “काल माझी सुमारे साडेआठ तास चौकशी झाली, तर आज तब्बल 11 तास प्रश्न विचारण्यात आले. हे 2023 मधील प्रकरण आहे आणि तपास यंत्रणांनी जेव्हा-जेव्हा बोलावले, तेव्हा मी चौकशीसाठी हजर राहिलो आहे,” असे त्यांनी सांगितले.
चौकशीमागे राजकीय दबाव आहे का, असा प्रश्न विचारण्यात आला असता बॅनर्जी यांनी थेट उत्तर देणे टाळले. मात्र त्यांनी भाजपवर अप्रत्यक्षपणे निशाणा साधला. “यामध्ये राजकीय दबाव आहे की नाही, याबाबत मी काही बोलणार नाही. भाजपबद्दल जितके कमी बोलले जाईल तितके चांगले,” अशी प्रतिक्रिया त्यांनी दिली.
यावेळी त्यांनी तृणमूल काँग्रेसमध्ये झालेल्या फुटीचाही उल्लेख केला. “एकीकडे ते आमचा पक्ष फोडत आहेत आणि निवडणुकीनंतर हिंसाचारालाही खतपाणी घालत आहेत. मात्र कोणत्याही दबावाला मी घाबरणार नाही,” असे बॅनर्जी म्हणाले.
तपास यंत्रणांकडून भविष्यात पुन्हा समन्स आल्यास आपण सहकार्य करणार का, या प्रश्नावर त्यांनी स्पष्ट शब्दांत सांगितले की, “भविष्यातही ईडी किंवा कोणत्याही तपास यंत्रणेने मला चौकशीसाठी बोलावले, तर मी नक्की हजर राहीन.”




























































