गोदावरीतील वाळू चोरी प्रकरण मास्टर माईंड तहसीलदाराला अभय, चिरीमिऱ्यावर गुन्हे दाखल

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

गेवराई चे तहसीलदार संदीप खोमणे सह मंडळ अधिकारी आणि तलाठी यांच्या सिंडीकेटने राक्षस भुवन गोदावरी पात्रातून 25 हजार पेक्षा अधिक ब्रास वाळूचा उपसा करून घरकुलच्या नावाखाली या वाळूची चोरी केल्याचे प्रकरण जिल्ह्यात गाजत आहे. या प्रकरणात तहसीलदार संदीप खोमणे यांच्यासहित 40 ते 50 जणांविरुद्ध गुन्हे दाखल होणार अशी शक्यता व्यक्त केली होती. त्याच दरम्यान जिल्हाधिकारी विवेक जॉन्सन यांनी चौकशीचा मोठा आव आणत तहसीलदार खोमणे मंडळ अधिकारी चांदणे यांना वगळून इतर 19 लोकांवर गुन्हे दाखल करत स्वतःची पाठ थोपटून घेण्याचा प्रयत्न केला आहे. या संपूर्ण वाळू चोरी आणि सिंडिकेट प्रकरणाचा मास्टरमाइंड आणि खरा दोषी असणारा तहसीलदार संदीप खोमणे याला कोणाच्या दबावाला बळी पडून जिल्हाधिकारी जॉन्सन यांनी वाचवण्याचा प्रयत्न केला आहे अशी चर्चा आता सुरू झाली आहे.

गेवराई तालुक्यातील घरकुल लाभार्थ्यांना शासनाच्या नियमानुसार वाळू वाटप करण्याच्या नावाखाली तहसीलदार संदीप खोमणे मंडळ अधिकारी चांदणे आणि तलाठी ढाकणे यांच्या सिंडिकेट ने तब्बल 90 ते 100 कोटी रुपयांची 25 ते 50 हजार ब्रास वाळू चोरी केली आणि ही वाळू खुल्या बाजारात विक्री केली, या प्रकरणात एस आय टी चौकशीची मागणी केली होती.

आपल्यावर कारवाई होणार हे कन्फर्म झाल्यानंतर तहसीलदार संदीप खोमणे हे थेट मुंबईला पोहोचले तेथे त्यांनी त्यांच्या जवळच्या मंत्र्यांमार्फत थेट महसूल मंत्र्यांपर्यंत वशिला लावला, यामुळे खोमणे यांच्यावरचा गुन्हा दाखल करणे टाळण्यात आले अशी चर्चा सुरू झाली आहे.

या सर्व गंभीर प्रकरणाची दखल घेत जिल्हाधिकारी विवेक जॉन्सन यांनी तलाठी मंडळ अधिकारी ग्रामसेवक अशा 38 जणांची दिवसभर चौकशी केली त्याचा अहवाल तयार केला तसेच तहसीलदार संदीप खोमणे यांची देखील शोकास नोटीस देऊन चौकशी केली त्यामुळे या सर्व प्रकरणात तहसीलदार खोमणे आणि इतर दोषी 30 ते 40 जणांवर गुन्हे दाखल होतील आणि ते निलंबित होतील अशी शक्यता व्यक्त केली जात होती.मात्र तसे काही झाले नाही वाळू चोरी प्रकरणातील मास्टर माईंड संदीप खोमणे याला अलगत सही सलामत बाहेर काढत साहेबाचा आदेश पाळणाऱ्या कर्मचाऱ्यावर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत, या सर्व प्रकरणात जिल्हा उतखनन अधिकारी, उप विभागीय अधिकारी आणी दस्तूरखुद्द जिल्हाधिकारी यांचे हात अडकले नाहीत ना असा संशय व्यक्त होऊ लागला, चोर सोडून संन्याश्या फाशी असा पराक्रम बीड मध्ये घडला आहे.