कोकणातील कातळशिल्पांचे रहस्य उलगडणार; संशोधन, संवर्धनासाठी चेन्नईतील आयआयटीएम संस्थेशी पुरातत्त्व विभागाचा सामंजस्य करार

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

कोकणातील हजारो कातळशिल्पांचे रहस्य लवकरच उलगडणार आहे. जागतिक महत्त्वाच्या कातळशिल्पांचा वैज्ञानिक अभ्यास, डिजिटल दस्तऐवजीकरण आणि संवर्धनासाठी पुरातत्त्व व वस्तुसंग्रहालये संचालनालय आणि आयआयटीएम प्रवर्तक टेक्नालॉजी फाऊंडेशन, चेन्नई यांच्यात सांस्कृतिक कार्य मंत्री आशीष शेलार आणि महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या उपस्थितीत सामजंस्य करार झाला.

पुरातत्त्व व वस्तुसंग्रहालये संचालनालयाने रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिह्यातील सुमारे 80 गावांमध्ये सर्वेक्षण करून आतापर्यंत जवळपास 2 हजार कातळशिल्पे प्रकाशात आणली आहेत. प्रामुख्याने प्रागैतिहासिक कालखंडातील या कातळशिल्पांमध्ये हत्ती, एकशिंगी गेंडा, कासव, पाणघोडा, पक्षी, मानवी आकृत्या तसेच अनेक अनाकलनीय आकृत्यांचा समावेश आहे.

 सामंजस्य करारामुळे प्रकल्पातून तयार झालेला डेटा, संशोधन अहवाल, नकाशे, डिजिटल दस्तऐवजीकरण आणि अभिलेख यांचे परस्पर आदान-प्रदान सुलभ होणार आहे. तसेच प्रकल्पासाठी वापरण्यात आलेली तांत्रिक उपकरणे आणि संशोधन साधने संचालनालयाकडे हस्तांतरित करण्याची प्रक्रिया सुलभ होईल.
 कोकणातील अनमोल पुरातत्त्वीय आणि सांस्कृतिक वारशाचे महत्त्व लक्षात घेऊन देवीहसोळ, कशेळी, रुंढे तळी, उक्षी, बारसू, जांभरूण, देवाचे गोठाणे, कुडोपी आणि गोवा राज्यातील फंसाईमाळ या नऊ कातळशिल्प स्थळांचा समावेश युनेस्कोच्या जागतिक वारसा नामांकनाच्या तात्पुरत्या यादीत करण्यात आला आहे.