
प्रधानमंत्री विकसित भारत रोजगार योजनेंतर्गत लाभ घेतलेले लाभार्थी व कर्मचारी यांच्या योगदानाचा गौरव शुक्रवारी 19 जून रोजी करण्यात येणार आहे. कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटनेच्या वतीने घाटकोपर येथील रामजी असर विद्यालय सभागृहात हा कार्यक्रम होणार आहे. यावेळी कर्मचाऱयांना अधिकारी तसेच उद्योग संघटनांचे प्रतिनिधी मार्गदर्शन करणार आहेत.
घाटकोपर कार्यक्षेत्रातील 3 हजार 647 आस्थापनांनी प्रधानमंत्री विकास भारत रोजगार योजनेंतर्गत नोंदणी केली आहे. तसेच 40 हजार 447 जणांना रोजगार मिळाला असून त्यांची विविध आस्थापनांमध्ये नियुक्ती करण्यात आली आहे. 1 लाख 55 हजार 777 हे पुनर्नियुक्त कर्मचारी असून शुक्रवारी होणाऱया विशेष कार्यक्रमात लाभार्थ्यांचा व कर्मचाऱयांचा सन्मान केला जाणार आहे.
या कार्यक्रमादरम्यान प्रधानमंत्री नरेंद्र मोदी हे लाभार्थ्यांना संबोधित करणार असून त्यांच्याशी संवाददेखील साधणार आहेत. कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटनेच्या प्रादेशिक कार्यालयाच्या वतीने हा कार्यक्रम पार पडणार असल्याचे कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटनेच्या प्रसिद्धीपत्रकात म्हटले आहे.

























































