NEET News – ९ विद्यार्थ्यांचा मृत्यू हा खूनच, काँग्रेसचा केंद्र सरकारवर हल्लाबोल

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

देशातील सर्वात मोठी वैद्यकीय प्रवेश परीक्षा असलेल्या नीट २०२६ मधील पेपर लीक आणि त्यानंतरच्या गोंधळामुळे देशभरातील लाखो विद्यार्थ्यांचे मनोधैर्य खचले आहे. यावरून आता राजकारण चांगलेच तापले असून, काँग्रेसने थेट केंद्र सरकारवर अत्यंत गंभीर आरोप केले आहेत. नीट पेपर लीक आणि री-नीटच्या मानसिक दबावामुळे आतापर्यंत ९ विद्यार्थ्यांनी आपले जीवन संपवले आहे, असे काँग्रेसने आपल्या X अकाऊंटवर एक पोस्ट शेअर करत म्हटले आहे.

काँग्रेस पक्षाने त्यांच्या अधिकृत X हँडलवर एक पोस्ट शेअर करून मोदी सरकारवर आणि शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्यावर जोरदार टीका केली आहे. या ९ विद्यार्थ्यांच्या मृत्यूला काँग्रेसने आत्महत्या नसून खून, असल्याचे म्हटले आहे. काँग्रेसने ज्या ९ विद्यार्थ्यांची नावे आणि राज्ये जाहीर केली आहेत, ती खालीलप्रमाणे –

१. प्रदीप मेघवाल – राजस्थान
२. अंशिका पांडे – दिल्ली
३. ऋतिक मिश्रा – उत्तर प्रदेश
४. सिद्धार्थ हेगडे – गोवा
५. भाग्यश्री – कर्नाटक
६. आकांक्षा चतुर्वेदी – मध्य प्रदेश
७. उमेश माली – राजस्थान
८. रेणू मीणा – राजस्थान
९. रिया कुमारी थापा – उत्तराखंड

काँग्रेसने आपल्या पोस्टमध्ये म्हटले आहे की, “ही आत्महत्या नसून खून आहे, जो नरेंद्र मोदी, धर्मेंद्र प्रधान आणि त्यांच्या असक्षम सरकारने केला आहे. मोदी सरकार आपल्या फायद्यासाठी निष्पाप विद्यार्थ्यांच्या जीवाशी खेळत आहे आणि त्यांची स्वप्ने चिरडून कुटुंबे उद्ध्वस्त करत आहे. हा एक अक्षम्य पाप आहे, ज्याची कोणतीही माफी नाही.”

याचबरोबर धर्मेंद्र प्रधान यांना शिक्षणमंत्री पदावर राहण्याचा कोणताही अधिकार उरलेला नाही, त्यांनी त्वरित आपल्या पदाचा राजीनामा द्यावा, अशी मागणीही काँग्रेसकडून करण्यात आली आहे.