
एका ग्राहकाकडून पिशवीसाठी अतिरिक्त 6 रुपये घेतल्याने बाटा कंपनीला चांगलेच महागात पडले. जास्तीचे पैसे घेतल्याने या ग्राहकाने ग्राहक मंचाकडे तक्रार केल्याने कंपनीला 10 हजार रुपयांचा दंड ठोठावण्यात आला आहे. हा निर्णय साऊथ दिल्ली जिल्हा ग्राहक तक्रार निवारण मंचाने दिला आहे.
प्रीती अग्रवाल यांनी मे 2023 मध्ये बाटा कंपनीच्या एका शोरूममधून 1499 रुपयांचे बूट खरेदी केले होते. बूट ठेवण्यासाठी कॅशियरने कागदी पिशवीचे अतिरिक्त 6 रुपये बिलामध्ये जोडले. यावर प्रीती अग्रवाल यांनी आक्षेप घेतला. ग्राहक खरेदी केलेला बुटाचा बॉक्स हातात कसा घेऊन फिरणार, पिशवी देणे कंपनीची जबाबदारी आहे, असा युक्तिवाद त्यांनी केला, परंतु शोरूममधील कर्मचाऱ्यांनी त्यांच्याशी उद्धट वर्तन केल्याने त्यांनी याविरोधात ग्राहक मंचाकडे धाव घेतली.





























































