
राज्य सरकारने शेतकऱ्यांना दिलेली आश्वासने वारंवार मोडीत निघत असून कर्जमाफी, पीक विमा आणि नुकसानभरपाईच्या प्रश्नावर शेतकऱ्यांची सातत्याने फसवणूक होत असल्याचा तीव्र संताप आज सिंदखेडराजा येथे व्यक्त करण्यात आला. यावेळी संतप्त शेतकऱ्यांनी जिजाऊ माऊली, आता तूच न्याय दे, अशी आर्त हाक देत कर्जमाफीच्या जीआरचा निषेध केला.
राज्यातील शेतकऱ्यांचा सातबारा कोरा करण्याचे आश्वासन देण्यात आले होते. मात्र काढण्यात आलेल्या कर्जमाफीच्या जीआरमुळे अनेक शेतकरी वंचित राहिले आहेत. बुलढाणा जिह्यासह अनेक भागात अतिवृष्टीमुळे पिकांचे मोठे नुकसान झाले असून अनेक ठिकाणी 50 पैशांपेक्षा कमी आणेवारी नोंदवली गेली आहे. शासनाने मदत जाहीर केली, मुख्यमंत्री यांनी पीक विम्याची घोषणा केली, मात्र आजपर्यंत अनेक शेतकऱ्यांच्या खात्यात मदतीची रक्कम जमा झालेली नाही. या अन्यायाविरोधात शेतकरी नेते रविकांत तुपकर यांनी बुलढाणा येथे अन्नत्याग उपोषण सुरू केले असून आज त्यांच्या उपोषणाचा तिसरा दिवस आहे. मात्र शासन आणि प्रशासन त्यांच्या आंदोलनाकडे दुर्लक्ष करत असल्याने शेतकऱ्यांमध्ये तीव्र नाराजी निर्माण झाली आहे. याच पार्श्वभूमीवर आज राष्ट्रमाता जिजाऊ माँसाहेबांच्या पवित्र भूमीत सिंदखेडराजा येथील राजवाडय़ात जिजाऊ माँसाहेबांच्या प्रतिमेसमोर राज्य सरकारचा कर्जमाफीचा जीआर ठेवून सरकारला सद्बुद्धी मिळावी व शेतकऱ्यांना न्याय मिळावा अशी प्रार्थना करण्यात आली.
न्याय द्या; शेतकरी आता गप्प बसणार नाहीत
पुढील काही दिवसांत सरकारने सकारात्मक निर्णय घेतला नाही तर आंदोलन अधिक तीव्र करण्यात येईल आणि त्याची सर्वस्वी जबाबदारी सरकारची राहील, असा इशाराही देण्यात आला. ‘शेतकऱ्याच्या घामाला दाम द्या, शेतकऱ्याच्या कष्टाला न्याय द्या; अन्यथा महाराष्ट्रातील शेतकरी आता गप्प बसणार नाही,’ असा निर्धार यावेळी व्यक्त करण्यात आला. आंदोलनात शेतकरी योद्धा कृती समिती, क्रांतिकारी संघटना, लोकजागर परिवार तसेच विविध शेतकरी संघटनांचे पदाधिकारी, कार्यकर्ते आणि शेतकरी मोठय़ा संख्येने उपस्थित होते.






























































