विनय आपटे यांच्या आठवणींना उजाळा, जयंतीनिमित्त पुरस्कारप्राप्त एकांकिकांचे सादरीकरण

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

आजही नाटक संपल्यानंतर प्रेक्षकांकडून ज्या टाळ्या मिळतात, त्यातील पहिल्या शंभर टाळ्या या विनय सरांच्याच असतात, अशा अत्यंत विनम्र भावना विनय आपटे यांचे शिष्य, अभिनेते संकर्षण कऱहाडे यांनी व्यक्त केल्या. सुप्रसिद्ध अभिनेते, दिग्दर्शक, निर्माते आणि लेखक विनय आपटे यांच्या जयंतीनिमित्त ‘विनय आपटे प्रतिष्ठान’तर्फे आयोजित पुरस्कारप्राप्त एकांकिका सादरीकरणाच्या कार्यक्रमात ते बोलत होते.

ठाण्यातील गडकरी रंगायतन येथे हा सोहळा झाला. यावेळी डॉ. उदय निरगुडकर यांनी विनय आपटे यांच्यासोबतच्या वैयक्तिक आठवणींना उजाळा दिला.‘एकदा आवाजाच्या कार्यशाळेसाठी विनय ठाण्यात स्कूटरवरून भिजत भिजत आले. पाऊस वाढल्याने सगळीकडे पाणी साचले. परत जाता येणार नाही, हे लक्षात येताच त्यांनी ‘आपण रात्रीपर्यंत कार्यशाळा घेऊ’ असे म्हणत थेट रात्री 12 वाजेपर्यंत कार्यशाळा घेतली,’ हा त्यांची कामाप्रती निष्ठा होती, असे निरगुडकर म्हणाले.संस्थेच्या विश्वस्त वैजयंती आपटे म्हणाल्या, ‘विनय आपटे वाढदिवसाला कधीही सुट्टी न घेता काम करायचे. त्यांचा वाढदिवस हा नाटय़क्षेत्रात पहिलं पाऊल टाकणाऱ्या तरुण मुलांच्या सादरीकरणाने साजरा करणे, हीच त्यांना खरी श्रद्धांजली आहे.’

या सोहळ्यात विविध स्पर्धांमध्ये पुरस्कार मिळालेल्या विजेत्या एकांकिका सादर करण्यात आल्या. यात जोशी-बेडेकर महाविद्यालयाच्या ‘मढं निघालं अनुदानाला’, पार्ल्याच्या म. ल. डहाणूकर महाविद्यालयाची ‘जब वी मेटा’ ही एकांकिका सादर करण्यात आली. उत्तम विषय, कसदार सादरीकरण आणि नेटके आयोजन यामुळे ठाणेकर रसिक प्रेक्षकांनी नाटय़गृहात शेवटपर्यंत लक्षणीय गर्दी केली होती.