लोकल ट्रेन पहिल्यांदाच ‘नीट’ धावली! मध्य, पश्चिम रेल्वे मार्गावर ‘ब्लॉक’ नसल्याने वाहतूक सुरळीत

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा
Western Railway to Start 4 New Local Train Services from February 1

रविवार म्हटले की लोकल ट्रेनचे विस्कळीत वेळापत्रक ठरलेलेच. मध्य रेल्वेच्या मेन लाईन आणि हार्बरवर दर रविवारी गाडय़ांचा गोंधळ असतो. मात्र ‘नीट’च्या परीक्षेमुळे पहिल्यांदाच मध्य रेल्वेची लोकल वाहतूक रविवारी ‘नीट’ धावली. प्रशासनाने ब्लॉक रद्द करण्याबरोबरच लोकल फेऱया वेळेवर चालवल्या. त्यामुळे स्थानकांतील गर्दी, ट्रेनच्या गेटवरील रेटारेटी हे चित्र रविवारी दिसले नाही. पश्चिम रेल्वेनेही लोकल वाहतूक सुरळीत चालवण्यात यश मिळवल्याने मुंबईकरांसाठी रविवारचा लोकल प्रवास ‘तापमुक्त’ ठरला.

वैद्यकीय अभ्यासक्रमांना प्रवेश घेणाऱया विद्यार्थ्यांसाठी महत्त्वपूर्ण असलेली ‘नीट’ची फेरपरीक्षा रविवारी नॅशनल टेस्टिंग एजन्सीद्वारे घेण्यात आली. यापूर्वी पेपरफुटीमुळे देशभर वादाच्या भोवऱ्यात सापडलेली ‘नीट’ची परीक्षा सुरळीत पार पाडण्यासाठी मध्य आणि पश्चिम रेल्वे प्रशासनाने ब्लॉक रद्द केला होता. पश्चिम रेल्वेने सर्व उपनगरीय सेवा (1414 लोकल फेऱया) आठवडय़ाच्या कामकाजाच्या दिवसांच्या वेळापत्रकानुसार तर एसी उपनगरीय सेवा रविवारच्या वेळापत्रकानुसार चालवण्याचे ठरवले होते. तसेच मध्य रेल्वेने सर्वच्या सर्व 1820 लोकल फेऱया चालवण्याचा निर्णय जाहीर केला होता. त्यानुसार दोन्ही रेल्वे प्रशासनाने लोकल फेऱया वेळेवर चालवल्याने प्रवाशांची गैरसोय झाली नाही. विशेष म्हणजे, बेस्ट बसेसचा संप असूनही लोकल ट्रेन आणि रेल्वे स्थानकांत मोठय़ा गर्दीचे चित्र नव्हते. लोकल फेऱया वेळेवर चालवण्यात आल्या आणि एकही फेरी रद्द केली नाही. त्याचा चांगला परिणाम लोकल सेवेवर दिसून आल्याचे समाधान रेल्वे प्रवाशांनी व्यक्त केले.

प्रशासनाने नेहमी वेळेवर गाड्या चालवाव्यात!

रविवारी रेल्वेच्या तिन्ही मार्गांवर ‘ब्लॉक’चा गोंधळ नव्हता. रेल्वे प्रवाशांना रखडपट्टी, गर्दी, धावाधाव अशी कुठलीही डोकेदुखी सहन करावी लागली नाही. ‘नीट’च्या परीक्षेसाठी प्रशासन जर लोकलसेवा वेळेवर चालवू शकते, कुठलेही कारण दिले जात नाही, तर मग इतर दिवशीही याच पद्धतीने व्यवस्थापन करावे आणि नेहमी गाडय़ा वेळेवर चालवाव्यात, अशी प्रतिक्रिया अनेक प्रवाशांनी दिली.