FIFA World Cup 2026 – वारचा राडा

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

>>मंगेश वरवडेकर

गेल्या काही दिवसांपासून जग अमेरिका-इराण संघर्षामुळे पेटलेलं होतं. क्षेपणास्त्रं, बॉम्ब, धमक्या आणि प्रतिधमक्या. पण फिफा वर्ल्ड कपमध्येही त्याहून कमी तापलेलं युद्ध सुरू नाही. तिथे गोळ्या झाडल्या जात नाहीत, तिथे गोल झाडले जातात आणि त्यानंतर सुरू होतं एक नवं युद्ध- रेफ्री विरुद्ध वार.

एकेकाळी फुटबॉलमध्ये रेफ्री म्हणजे मैदानावरील सर्वोच्च न्यायालय असायचं. त्याने बोट दाखवलं की निर्णय अंतिम. अपील नाही, पुनर्विचार नाही. पण आता रेफ्रीची अवस्था एखाद्या सरकारी कार्यालयातील कारकुनासारखी झालीय. फाईल वर पाठवायची आणि वरून काय आदेश येतो त्याची वाट बघायची!

या वर्ल्ड कपच्या पहिल्या नऊ दिवसांत वारने धुमाकूळ घालून जेवढी प्रसिद्धी मिळवली, तेवढी काही संघांनाही मिळाली नसेल. गोल झाला की खेळाडू आनंदाने धावत सुटतो. प्रेक्षक ओरडायला लागतात. प्रशिक्षक हवेत उडय़ा मारतो आणि अचानक रेफ्री कानाला हात लावतो. सगळ्यांच्या छातीत धस्स होते.  तोपर्यंत स्टेडियममध्ये अशी शांतता पसरते जणू लग्नात वधूपक्षाने अचानक आम्हाला विचार करायला वेळ हवा असं सांगितलं असावं.

नऊ दिवसांत कित्येक गोल वारच्या शस्त्रक्रियेखाली गेले. काही गोलांचा जीव वाचला, काहींचं पोस्टमॉर्टम झालं. खेळाडूंनी गोलपेक्षा ऑफसाईड रेषेकडे जास्त लक्ष द्यायला सुरुवात केली आहे. आता स्ट्रायकर चेंडू मारण्याआधी स्वतःची सावली ऑफसाईडमध्ये गेली नाही ना, याची खात्री करत असेल!

वारचा सर्वात मोठा परिणाम प्रेक्षकांवर झाला आहे. पूर्वी गोल झाला की आनंदाचा स्फोट व्हायचा. आता गोल झाला की लोक अर्धवट आनंद साजरा करतात. जणू बँकेतून कर्ज मंजूर झाल्याचा मेसेज आला आहे, पण रक्कम खात्यात पडायची बाकी आहे.

काही सामन्यांमध्ये तर वारने खेळापेक्षा जास्त वेळ घेतल्याची भावना निर्माण झाली. रेफ्री स्क्रीनकडे चालत जातो, परत येतो, पुन्हा जातो. ते पाहताना वाटतं आपण फुटबॉल सामना पाहतोय की डॉक्टर एमआरआय रिपोर्ट तपासत आहेत? पण सगळा दोष वारलाही देता येणार नाही. अनेक वेळा त्याने उघड अन्याय रोखला. चुकीचे पेनल्टी निर्णय उलटवले. फाऊल शोधले. रेफ्रीच्या नजरेतून सुटलेले गुन्हे पकडले. म्हणजे तो फुटबॉलचा सीसीटीव्ही कॅमेरा आहे. फरक एवढाच की सीसीटीव्ही गुह्यानंतर जागा होतो आणि वार गोल झाल्यावर.

या नऊ दिवसांत जर्मनीने कुरासावला सात गोल मारले, जपानने टय़ुनिशियाला चार गोल दिले, नेदरलँड्सने स्वीडनला धूळ चारली, तर मोरोक्को, काबो वर्दे, कोंगो, जॉर्डन यांच्यासारख्या संघांनी मोठय़ांच्या छातीत धडकी भरवली, पण या सगळ्या कामगिरीवर अनेकदा चर्चा कमी आणि वारवर चर्चा जास्त झाली. आज परिस्थिती अशी आहे की, सामन्यानंतर खेळाडूंच्या मुलाखतींपेक्षा वारांच्या निर्णयांवर जास्त चर्चा होते. सोशल मीडियावर रेफ्रींपेक्षा स्क्रीनचे फोटो जास्त फिरतात. फुटबॉलमध्ये आता दोन संघ खेळत नाहीत. तिसरा संघही असतो. तो म्हणजे वार.

इराण-अमेरिका संघर्ष किती दिवस चालेल माहीत नाही. पण फुटबॉलमध्ये रेफ्री आणि वार यांचं शीतयुद्ध अजून अनेक वर्षं चालणार आहे. कारण चेंडू गोलपोस्टमध्ये जातो की नाही हे समजण्यापेक्षा, वारला तो गोल मान्य आहे की नाही हे समजणं आजकाल जास्त कठीण झालंय! म्हणूनच या वर्ल्ड कपच्या पहिल्या नऊ दिवसांचा खरा सुपरस्टार मेस्सी, एमबाप्पे किंवा रोनाल्डो नाही… तो आहे मैदानाच्या कडेला उभा असलेला एक स्क्रीन. कारण आजकाल फुटबॉलमध्ये गोल आधी होत नाही… तो आधी वारमध्ये जन्माला येतो! म्हणूनच व्हिडीओ असिस्टंट रेफ्री आता रेफ्री नव्हे तर राडा झालाय. तो पुढेही असाच सुरू राहील. आता तो वर्ल्ड कपचा नायक ठरतोय की खलनायक हे लवकरच कळेल.