
>> डॉ. गजानन शेपाळ
जूनमध्ये येणाऱ्या मान्सूनने जरी दडी मारलेली असली तरी नेहरू सेंटर, वरळी येथील कला दालनात येणारा ‘चातक मान्सून शो’ मात्र त्याच्या नियोजित वेळेतच सुरू होत आहे. 23 जून ते 29 जून 2026 च्या सप्ताहात नेहरू सेंटर कला दालनात 76 ‘चातका’च्या कलाकृती प्रदर्शित होत आहेत. गॅलरीचे व्यवस्थापन पाहणाऱ्या संतोष पेडणेकर यांनी या प्रदर्शनाच्या आयोजनासंबंधित माहिती देताना सांगितले की, “संपूर्ण भारतातून सुमारे 482 कलाकारांनी ‘चातक शो’मध्ये सहभागी होण्यासाठी अर्ज केले होते. पैकी 76 कलाकारांना, ज्यामध्ये व्यावसायिक कलाकार आणि कला विद्यार्थी यांचा समावेश आहे, अशा निवडक कलाकारांच्या कलाकृतींचे प्रदर्शन सुरू होत आहे.’’ भारतातील मध्य प्रदेश, हिमाचल प्रदेश, आंध्र प्रदेश, गोवा या राज्यांसह यजमान महाराष्ट्रातील ही काही कलाकारांच्या कलाकृती या प्रदर्शनात पाहता येतील. ‘चातक’ हा शो केवळ महाराष्ट्र राज्यापुरताच मर्यादित न राहता साऱ्या भारताचा म्हणून ओळखला जाऊ लागला आहे.
या प्रदर्शनात एक जलरंगातील मुलीचे चित्रण केलेले असून पाळीव प्राण्यांमधील कुत्रा आणि मांजर यांच्या चेहऱयांवरील भाव टिपत एकूण दहा मुखे दाखवलेली आहेत. हाताची घडी घातलेली असून हृदयाच्या जागी ‘पृथ्वी’चे चित्र चितारलेले आहे. चित्राच्या पार्श्वभावर एकदम फिकट रंगात घराचे आकार दिसत असून या पाळीव प्राण्यांचे पायांचे ठसे दिसताहेत. हे झालं दृश्य वर्णन आता या चित्राचा ‘लौकिक’ आशय फारच व्यापक आहे. हे पाळीव प्राणी माणसांसह त्या घराची फारच काळजी घेतात असंच कदाचित सदर चित्रकाराला सुचवायचे असावे.
या प्रदर्शनात म्युरल पेंटिंग, अमूर्त शैलीतील पेंटिंग, छायाचित्रण शिल्पाकृती, निसर्गचित्रणे अशा विविध कलाशैली आणि तंत्रातील कलाकृती प्रदर्शित झालेल्या आहेत.
या प्रदर्शनाच्या कालावधीत ज्येष्ठ चित्रकर्ती गायत्री मेहता यांचे प्रात्यक्षिक सादर केले जाणार आहे. जलरंगात एकजीव होणाऱया रंग माध्यमांद्वारे त्या संकल्पन सादर करणार आहेत. याच काळात तरुण आणि आकाश पै यांची प्रात्यक्षिके सादर केली जाणार आहेत.
प्रदर्शन स्थळी प्रदर्शनी कलाकृतींसोबतच प्रयोगशील चित्रकारांच्या प्रात्यक्षिकांचा नजराणा, नेहरू सेंटर कला दालन व्यवस्थापनाने पेश केलेला आहे. ही पर्वणी सर्वच कलासक्त रसिकांना अनोखी ठरेल असे वाटते. कला प्रदर्शने खूप होत असतात, परंतु सर्वसामान्य कला रसिकांना भावतील, आवडतील आणि स्मरणात राहतील अशा कलाकृती फार कमी वेळेस पहायला मिळतात. अशा आपल्याशी संवाद साधणाऱया ‘चातक शो’च्या कलाकृती पाहण्याची पर्वणी या 23 ते 29 जूनच्या सप्ताहात आलेली आहे.
या मान्सून शोचे औपचारिक उद्घाटन राज्याचे कला संचालक डॉ. किशोर इंगळे यांच्या शुभहस्ते होत असून हे प्रदर्शन पाहण्यासाठी सर्वांनी यावे असे आवाहन नेहरू सेंटर कला दालन व्यवस्थापनाने केलेले आहे.






























































