
महाराष्ट्रात 2025 या वर्षात महिलांवरील बलात्कार, बालकांवरील अत्याचार तसेच सायबर गुन्ह्यांच्या घटनांमध्ये लक्षणीय वाढ झाल्याची कबुली मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मंगळवारी विधानसभेत लेखी उत्तराद्वारे दिली. 2024 च्या तुलनेत 2025 मध्ये बलात्काराच्या गुन्ह्यांमध्ये 8.85 टक्क्यांनी वाढ झाली असल्याचे मुख्यमंत्री फडणवीस यांनी स्पष्ट केले.
मुख्यमंत्र्यांनी दिलेल्या माहितीनुसार, 2024 मध्ये राज्यात महिलांवरील बलात्काराचे 7,940 गुन्हे नोंदवले गेले होते. 2025 मध्ये ही संख्या वाढून 8,643 वर पोहोचली. तसेच बालकांवरील अत्याचाराच्या घटनांमध्येही 482 प्रकरणांची वाढ झाली आहे. मात्र, नोंदविलेल्या गुन्ह्यांच्या संख्येत वाढ झाली म्हणजे प्रत्यक्ष गुन्हेगारी वाढली असे नाही, असे स्पष्ट करताना फडणवीस म्हणाले की, पोलिस यंत्रणेची सुधारलेली कार्यपद्धती, ई-एफआयआर सुविधा आणि महिलांमध्ये वाढलेली जागरूकता यामुळे अधिक तक्रारी नोंदवल्या जात आहेत.
एप्रिल 2026 मध्ये प्रसिद्ध झालेल्या राष्ट्रीय गुन्हे नोंदवही ब्युरोच्या (NCRB) 2024 च्या अहवालानुसार, महाराष्ट्रात महिलांविरुद्धच्या गुन्ह्यांची 47,954 प्रकरणे नोंदवली गेली असून या बाबतीत राज्य देशात दुसऱ्या क्रमांकावर आहे. कोल्हापूर पोलिस परिक्षेत्रात 2024 आणि 2025 या कालावधीत महिलांवरील गुन्ह्यांची 2,362 प्रकरणे आणि विनयभंगाच्या 4,485 घटना नोंदविण्यात आल्या. अहिल्यानगर जिल्ह्यात 2022 ते 2025 या काळात अल्पवयीन मुलींवरील अत्याचाराची 641 प्रकरणे नोंदवली गेली. तर यंदाच्या वर्षी जानेवारी ते मार्च या तीन महिन्यांतच अशा 41 घटना समोर आल्या आहेत.
बालकांवरील गंभीर गुन्ह्यांमध्ये तातडीने कायदेशीर कारवाई करण्यात आल्याचेही मुख्यमंत्र्यांनी सांगितले. बदलापूर येथील शाळेत दोन अल्पवयीन मुलींवरील लैंगिक अत्याचार प्रकरणात 28 फेब्रुवारी 2026 रोजी न्यायालयात आरोपपत्र दाखल करण्यात आले. तसेच पुणे जिल्ह्यातील नसरापूर येथे अल्पवयीन मुलीवरील लैंगिक अत्याचार प्रकरणात 16 मे 2026 रोजी आरोपपत्र दाखल करण्यात आले.
महिला आणि बालकांवरील गुन्ह्यांना आळा घालण्यासाठी अतिरिक्त पोलिस महासंचालकांच्या नेतृत्वाखाली स्वतंत्र महिला व बालक गुन्हे प्रतिबंध विभाग स्थापन करण्यात आला आहे. राज्यातील सर्व पोलिस युनिटमध्ये स्वतंत्र तपास पथके तयार करण्यात आली असून महिलांशी संबंधित प्रकरणांसाठी 51 ‘भरोसा सेल’ कार्यरत करण्यात आल्याची माहितीही फडणवीस यांनी दिली.
दरम्यान, राज्यात सायबर फसवणुकीच्या घटनांमध्येही मोठी वाढ झाल्याचे मुख्यमंत्र्यांनी मान्य केले. 2025 ते मे 2026 या कालावधीत सायबर फसवणुकीची 10,505 प्रकरणे नोंदवली गेली असून 2,379 आरोपींना अटक करण्यात आली आहे. डिजिटल अटक, बनावट गुंतवणूक योजना, फिशिंग लिंक, संशयास्पद अॅप्लिकेशन फाइल्स आणि अन्य ऑनलाइन माध्यमांतून विशेषतः ज्येष्ठ नागरिकांना लक्ष्य करण्यात आले.




























































