
अहमदाबाद विमानतळावर बुधवारी एक मोठा विमान अपघात थोडक्यात टळल्याची घटना समोर आली आहे. मुंबईहून अहमदाबादला आलेले एअर इंडियाचे विमान उतरल्यानंतर पार्किंग बेकडे जात असताना चुकून चुकीच्या टॅक्सीवेवर वळले आणि त्याच मार्गावर मुंबईला जाणारे इंडिगोचे विमान उड्डाणासाठी टॅक्सींग करत होते. सुदैवाने, दोन्ही विमाने वेळेत थांबवण्यात आल्याने संभाव्य दुर्घटना टळली. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, इंडिगोचे 6E 5160 हे विमान अहमदाबादहून मुंबईकडे रवाना होण्यासाठी धावपट्टीकडे जात होते. त्याचवेळी मुंबईहून आलेले एअर इंडियाचे AI 2493 हे विमान पार्किंग बेकडे वळताना चुकीच्या टॅक्सीवेवर आले. परिणामी दोन्ही विमाने एकाच मार्गावर समोरासमोर आली.
एअर ट्रॅफिक नियंत्रण यंत्रणा आणि वैमानिकांच्या सतर्कतेमुळे दोन्ही विमाने सुमारे 200 मीटर अंतरावर थांबवण्यात आली. त्यामुळे मोठी दुर्घटना टळली. या घटनेत कोणत्याही प्रवाशाला किंवा कर्मचाऱ्याला इजा झाली नाही. एअर इंडियाने अधिकृत निवेदनात म्हटले आहे की, 24 जून रोजी अहमदाबाद विमानतळावर उतरल्यानंतर त्यांचे विमान पार्किंग बेकडे जात असताना अनवधानाने नियोजित मार्गापासून भरकटले. घटनेची माहिती तातडीने संबंधित नियामक यंत्रणांना देण्यात आली असून चौकशी सुरू करण्यात आली आहे. असे वृत्त नवभारत टाइम्सने दिले आहे.
एअरलाइनने पुढे सांगितले की, प्रवासी आणि कर्मचारी पूर्णपणे सुरक्षित होते. त्यानंतर संबंधित विमान टोइंग वाहनाच्या मदतीने सुरक्षितपणे पार्किंग बेमध्ये नेण्यात आले. दरम्यान, इंडिगोनेही या घटनेची पुष्टी केली आहे. कंपनीच्या म्हणण्यानुसार, अहमदाबाद-मुंबई उड्डाणासाठी सज्ज असलेले त्यांचे विमान टॅक्सींगदरम्यान काही काळ थांबवण्यात आले होते. दोन्ही विमानांमध्ये सुरक्षित अंतर राखले गेले होते. एअर इंडियाचे विमान हटवल्यानंतर इंडिगोचे विमान नियोजित वेळेनुसार मुंबईकडे रवाना झाले आणि सुरक्षितपणे छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळावर उतरले.
या घटनेनंतर विमानतळावरील ग्राउंड मूव्हमेंट, टॅक्सीवे व्यवस्थापन आणि वैमानिकांच्या समन्वयाबाबत प्रश्न उपस्थित झाले आहेत. विशेष म्हणजे, याच वर्षी फेब्रुवारी महिन्यात मुंबई विमानतळावर एअर इंडिया आणि इंडिगोच्या एअरबस A320 विमानांच्या पंखांची टक्कर झाल्याची घटना घडली होती. त्या पार्श्वभूमीवर अहमदाबादमधील हा प्रकार विमान सुरक्षा व्यवस्थेबाबत पुन्हा चिंता निर्माण करणारा ठरत आहे. सध्या या प्रकरणाची चौकशी सुरू असून, नेमकी चूक कुठे झाली याचा शोध संबंधित यंत्रणा घेत आहेत.


























































