
पुण्यातील दापोडी-हडपसर परिसरात विषारी दारूकांड प्रकरणातील सर्व आरोपींवर महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी नियंत्रण कायद्यांतर्गत ‘मकोका’ लावण्याबाबत शासन गंभीरतेने विचार करीत आहे. शिवाय या दारूकांडात मृत्यू झालेल्या सर्व 22 मृतांच्या कुटुंबीयांना पुढील सात दिवसांत आर्थिक मदत दिली जाईल, असे आज गृहराज्यमंत्री योगेश कदम यांनी विधान परिषदेत स्पष्ट केले.
पुण्यातील दारूकांडामध्ये 22 जणांचा विषारी दारूमुळे मृत्यू झाला. मात्र यातील फक्त 9 जणांच्या कुटुंबीयांनाच आर्थिक मदत करण्यात आली आहे. याबाबत आज भाजप आमदार अमित गोरखे यांनी लक्षवेधीच्या माध्यमातून प्रश्न उपस्थित केला. यावेळी या प्रकरणाला जबाबदार असणाऱ्या ‘पीएसआय’ अधिकाऱयाला वाचवण्याचा प्रयत्न होत असल्याचा आरोप शिवसेना आमदार ऍड. अनिल परब यांनी केला, तर या घटनेचा मुख्य सूत्रधार योगेश वानखेडे, कर्नल सिंग विरखा, राधेशाम प्रजापती यांच्यावर ‘आयपीसी’अंतर्गत गुन्हे दाखल करा, अशी मागणी आमदार अंबादास दानवे यांनी केली.
या गुन्ह्यासाठी बोगस आधार कार्ड वापरून भिवंडीतून 215 लिटर मिथेनॉल पुण्याला नेण्यात आल्याचे दानवे म्हणाले. त्यामुळे या प्रकाराला जबाबदार असणाऱ्या सर्व अधिकाऱ्या चे निलंबन करण्याची मागणीही त्यांनी केली, तर सचिन अहिर यांनी मृतांच्या कुटुंबातील सदस्याला शासकीय नोकरी देण्याची मागणी केली.
अशी केली कारवाई
या दारूकांडप्रकरणी स्थानिक वरिष्ठ पोलीस निरीक्षक, सहाय्यक पोलीस निरीक्षक, उपनिरीक्षक आणि उत्पादन शुल्क विभागाच्या निरीक्षकांसह अनेक जबाबदार अधिकाऱ्या ना निलंबित करण्यात आले आहे. या सर्व आरोपींवर आधीच सदोष मनुष्यवधाचे गुन्हे दाखल असून आहेत. हा संघटित गुन्हेगारीचा प्रकार असल्याने मुख्य सूत्रधारांवर ‘मकोका’ लावण्याबाबत कायदेशीर अभ्यास सुरू असल्याची माहिती सरकारकडून देण्यात आली.































































