
तामिळनाडूमध्ये विजय यांच्या नेतृत्वाखालील टीव्हीके सरकार पाडण्याचा उघडकीस आला आहे. राज्य गुप्तचर विभागाने दावा केला आहे की, टीव्हीके सरकारने सत्तेवर आल्यानंतर दोन महिन्यांच्या आतच सरकारला अस्थिर करण्याचा डाव उधळून लावण्यात आला आहे. टीव्हीकेने आरोप केला आहे की, डीएमके नेत्यांनी सरकार पाडण्यासाठी आमदारांना कोट्यवधी रुपयांचे आमिष दाखवले. पोलिसांनी या प्रकरणात आतापर्यंत तीन जणांना अटक केली आहे.
टीव्हीके सरकारमधील मंत्री निर्मल कुमार म्हणाले की, डीएमकेचे ज्येष्ठ नेते सेंथिल बालाजी यांनी स्टॅलिन आणि उदयनिधी यांच्या संमतीने गेल्या ४० दिवसांपासून आमच्या अनेक आमदारांशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला आणि त्यांना १० कोटी ते ५० कोटी रुपयांपर्यंतची लाच देऊ केली. असा एकही आमदार नाही, ज्याच्याशी त्यांनी संपर्क साधला नाही. त्यांनी एका आमदाराला धमकीही दिली. त्याने आता पोलिसांत तक्रार दाखल केली आहे. पोलिसांनी या घोडेबाजारात सामील असलेल्यांना अटक केली आहे.
पोलिसांनी या प्रकरणात नरेश आणि त्यागराजनसह इतर तीन जणांना अटक केली आहे. . टीव्हीकेच्या एका नेत्याने दावा केला आहे की, आरोपींपैकी एक नरेश, हा सेंथिल बालाजीचा भाऊ अशोक कुमार याच्या थेट संपर्कात होता. प्रत्येक आमदाराला किती पैसे द्यायचे यावर नरेश दररोज अशोकसोबत चर्चा करत असे. त्यामुळे या प्रकरणाची सखोल चौकशी करण्यात यावी.
निर्मल कुमार म्हणाले, स्टॅलिन, उदयनिधी आणि सेंथिल बालाजी यांनी हे घाणेरडे काम थांबवावे. त्यांनी आमदारांना ५० कोटी रुपयांपर्यंतची ऑफर दिली आहे. तामिळनाडू विधानसभेत एका प्रस्तावित ठरावावरील मतदानादरम्यान आपली भूमिका बदलण्यासाठी आपल्याला ३५ कोटी रुपयांची ऑफर देण्यात आल्याचा आरोप टीव्हीकेचे आमदार डॉ. एन. इलैयाराजा (उथंगराई) यांनी केल्यानंतर तामिळनाडूमध्ये एक राजकीय वाद निर्माण झाला आहे.
पोलिसांकडे केलेल्या तक्रारीनुसार, थिरुनावुक्करसू नावाच्या एका व्यक्तीने, एका राजकीय सर्वेक्षण संस्थेचा प्रतिनिधी असल्याचा दावा करत आमदारांशी संपर्क साधला आणि नंतर मतदान प्रक्रियेदरम्यान पाठिंबा देण्याच्या बदल्यात पैशांची ऑफर दिली. असा आरोप आहे की आमदारांनी ही ऑफर नाकारली आणि नंतर पोलिसांकडे तक्रार केली. डॉ. एन. इलैयाराजा यांनी दावा केला की त्यांना आणि त्यांच्या कुटुंबाला धमक्याही मिळाल्या.
या तक्रारीच्या आधारे, ट्रिप्लिकेन पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. पोलिसांनी थिरुनावुक्करसूला अटक केली आहे. या प्रकरणी नरेश आणि थियागराजन यांच्यावर कारवाई करण्यात आली आहे. पोलिसांनी सांगितले की, पुढील तपास सुरू असून, या प्रकरणात सहभागी असलेल्यांच्या कथित संबंधांची चौकशी केली जात आहे.





























































