
घोडबंदर येथील सेंट झेवियर्स शाळेकडे दोन आरटीआय कार्यकर्त्यांनी २५ लाखांची खंडणी मागितली होती. मात्र या भ्रष्ट आरटीआय कार्यकर्त्यांचे अतिक्रमण विभागातील काही कर्मचारी-अधिकाऱ्यांबरोबर साटेलोटे असल्याचा संशय अॅण्टी करप्शन विभागाला आहे. त्यामुळे बदली झालेले अधिकारी-कर्मचारी चौकशीच्या भीतीने गॅसवर आहेत.
घोडबंदर येथे सेंट झेवियर्स हायस्कूल आणि ज्युनियर कॉलेज आहे. या शाळेच्या व्यवस्थापक बिरबल बंडगर यांच्या तक्रारीनंतर खंडणी विरोधी पथकाने आरटीआय कार्यकर्ता प्रमोद परदेशी (४६) आणि नारायण शर्मा (३८) या दोघांना १५ लाखांची लाच स्वीकारताना रंगेहाथ पकडण्यात आले. या प्रकरणातील तक्रारदारांनी आता गंभीर आरोप केला आहे. माजिवडा-मानपाडा प्रभाग समितीमधील कर्मचाऱ्यांनीच आपला मोबाईल क्रमांक खंडणीखोर आरोपींपर्यंत पोहोचवल्याचा दावा केला आहे. त्यातच दोन दिवसांपूर्वी वर्षानुवर्षे एकाच विभागात ठाण मांडून बसलेले अतिक्रमण विभागातील अधिकारी-कर्मचाऱ्यांची पालिका आयुक्तांनी बदली केली असून यातील काहीजण खंडणीविरोधी पथकाच्या रडारवर आले आहेत.
वसुलीच्या रॅकेटला कर्मचाऱ्यांचे संरक्षण
दोन्ही आरोपींना प्रभाग समिती कार्यालयात काही कर्मचाऱ्यांकडून विशेष वागणूक दिली जात होती. एवढेच नव्हे, तर शहरात सुरू असलेल्या काही खंडणी वसुलीच्या रॅकेटला पालिकेतील काही कर्मचारी संरक्षण देत असल्याची चर्चाही रंगू लागली आहे. त्यामुळे या चौकशीची मागणी तक्रारदाराने केली आहे.































































