
मुंबई महापालिकेचा कारभार चोराचिलट्यांच्या हाती गेला आहे. शिवसेना काळात नगरसेवकांचे आपापल्या भागात महत्त्व होते, वचक होता. आता ‘नगरपिते राज’ पुन्हा सुरू झाले व ‘खाते-पिते नगरपिता’ अशा धोरणाने ठेकेदारांकडून मिळणाऱ्या कमिशनचे वाटे पडले आहेत. चेंबूर येथे एक शाळकरी चिमुरडा व साकीनाक्यात 60 वर्षांचा वृद्ध याच खात्यापित्या नगरपित्यांनी घेतलेला बळी आहे. अश्विनी भिडे यांचा राजीनामा मागण्यापेक्षा पालिकेतील राजकीय शासनकर्त्यांवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्याची मागणी जोरात व्हायला हवी. शिवसेनेच्या नावाने बोटे मोडणाऱ्या अवलादीला आता तरी मुंबई महानगरपालिकेतील शिवसेनेचे महत्त्व समजले असेल. मुंबई महापालिका ठप्प पडली आहे. पालिकेच्या प्रत्येक मॅनहोलला भ्रष्टाचाराचे बूच बसले आहे.
पहिल्याच पावसात मुंबईचे जनजीवन साफ कोलमडून पडले आहे. मुंबई पालिकेचे हे अपयश आहे. जनजीवन नुसते कोलमडून पडले असे नाही, तर भाजपचे ढोंग, क्रूरता आणि भ्रष्टाचार उघडा पडला आहे. रितू तावडे यांनी महापौर म्हणून फिरणे सुरू ठेवले आहे. मध्यंतरी त्या तुंबलेल्या मुंबईची पाहणी करायला गेल्या. बरोबर लवाजमा होताच. या लवाजम्यातील एक अभियंताच महापौरांसमोर खड्ड्यात कोसळला आणि जायबंदी झाला. या आठवड्यात चेंबूर येथे शाळेच्या बसवर झाड कोसळले. त्यात एका निष्पाप चिमुरड्याचा जीव गेला. आता साकीनाका परिसरात उघड्या मॅनहोलमध्ये पडून एका व्यक्तीचा दुर्दैवी मृत्यू झाला. या दुर्घटनेस मुंबई पालिकेचे आयुक्त जबाबदार असल्याची बोंब उपमहापौर घाडी यांनी मारली. घाडी हे मिंधे गटाचे आहेत. उपमहापौर घाडी यांनी आयुक्त अश्विनी भिडे यांचा राजीनामा मागून खळबळ उडवली आहे. मुंबईची जी दैना उडाली आहे त्यास फक्त आयुक्त जबाबदार आहेत काय? नगरविकास खात्याचे मंत्री स्वतः मिंधे आहेत. त्यामुळे महापालिकेतला भ्रष्टाचार व ठेकेदारांची मनमानी या अपघातांना, निष्पापांच्या बळींना जबाबदार आहे. हा भ्रष्टाचार व दलाली रोखण्यात आयुक्त श्रीमती भिडे अपयशी ठरल्या आहेत. त्यामुळे दोन सदोष मनुष्यवधाचे पातक त्यांच्या शिरावर फुटले आहे. मिंधे सेनेचे उपमहापौर याबद्दल आयुक्तबाईंचा राजीनामा मागत आहेत. याला अकलेची दिवाळखोरी म्हणतात. आयुक्तांचा दोष असेल तर नगरविकास मंत्र्यांनी अश्विनी भिडे यांची बदली करावी; पण श्रीमती भिडे यांची बदली करण्याची हिंमत व अधिकार उपमुख्यमंत्री मिंधे यांना आहे काय? अर्थात महापालिकेचे राजकारण हे प्रशासनाला काम करू देत नाही. मुलुंडचा ‘पोपटलाल’ ऊठसूट पालिकेत घुसतो व बांगलादेशींना चुनचुनकर हाकलण्यासाठी
आयुक्तांवर दबाव आणतो.
मुळात बांगलादेशींना हाकलण्याचे काम मुंबई महापालिकेचे नसून ते देशाच्या गृह मंत्रालयाचे आहे. त्यामुळे पोपटलालने मुंबई पालिकेत त्याच्या राजकारणाचा दांडिया खेळण्यापेक्षा दिल्लीत गृहमंत्री अमित शहांच्या दालनात घुसून “बांगलादेशींना कधी हाकलताय’’ असा जाब विचारला पाहिजे. मुंबई पालिकेत या प्रश्नावर बांग देत राहिल्याने नागरी सुविधेबाबत सर्व कामे खोळंबली व त्यात दोन निष्पाप जिवांचे बळी गेले. पावसाळ्यापूर्वी पालिकेने नालेसफाई केली नाही, रस्ते दुरुस्त केले नाहीत, झाडांच्या फांद्या तोडल्या नाहीत. कधीही कोसळून पडतील अशी झाडे कापली नाहीत. परिणामी पावसाचा जोर वाढताच रस्त्यावर असंख्य झाडे उन्मळून पडली व ट्रॅफिक जाम होऊन लोकांचे हाल वाढले. महापौर रितू तावडे यांनी पावसाळ्यापूर्वी 104 टक्के नालेसफाई झाल्याची अधिकृत घोषणा केली होती. 100 टक्के नालेसफाई समजता येईल, पण 104 टक्के नालेसफाई हे काय गणित आहे? वरचे 4 टक्के कसले? ते कुठून आणले? मुंबई पालिकेत सरकारने नेमलेल्या मॅडम आयुक्त आहेत, पण आजही तेथे राज्य आहे ते सरकारच्या लाडक्या ठेकेदारांचे. आयुक्त अश्विनी भिडे म्हणतात, ज्या ठेकेदारांनी नालेसफाईचे काम नीट केले नाही व अशा बेजबाबदार ठेकेदारांमुळे लोकांना प्राण गमवावे लागले त्या ठेकेदारांविरुद्ध पोलिसांत गुन्हे दाखल करा. आयुक्त बाईसाहेब, तुमचा लौकिक कामाच्या बाबतीत बरा आहे. ‘मेट्रो वुमन’ अशी आपली ख्याती आहे. मुंबईतील मेट्रोसाठी आपण अनेक मोठे बोगदे करून घेतले, पण आयुक्त म्हणून आपल्याला मुंबईच्या रस्त्यावरील खड्डे दुरुस्त करता आले नाहीत व
नालेसफाईचा उडालेला बोजवारा
रोखता आला नाही. त्यामुळे आपण आयुक्तांच्या खुर्चीला न्याय देण्यास पात्र आहात का? भाजपचे लोकही महापालिका लुटून खात आहेत. पुन्हा मुंबईतील या भीषण परिस्थितीबाबत माफी मागण्याऐवजी भाजपचे मुंबई अध्यक्ष साटम-नामक ‘चाटम’ निर्लज्जपणे “काल झाड झाले, आज मॅनहोल’’ असे माध्यमांसमोर हसत सांगताना दिसले. ही फक्त संवेदनहीनता नाही, तर विकृती आहे. ठेकेदारांकडून हप्ते गोळा करून स्वतःची तिजोरी भरण्यामुळे आलेला हा माज आहे. याच प्रवृत्तीच्या लोकांनी अयोध्येतील श्रीराम मंदिरही लुटले आहे. अशा लुटारूंकडून काय अपेक्षा ठेवायची? मुंबई पालिकेच्या 90 हजार कोटींच्या राखीव ठेवी होत्या व त्या शिवसेना काळात वाढत गेल्या. या ठेवीही आता उडवण्यात आल्या. एकंदरीत मुंबई महापालिकेचा कारभार चोराचिलट्यांच्या हाती गेला आहे. शिवसेना काळात नगरसेवकांचे आपापल्या भागात महत्त्व होते, वचक होता. आता ‘नगरपिते राज’ पुन्हा सुरू झाले व ‘खाते-पिते नगरपिता’ अशा धोरणाने ठेकेदारांकडून मिळणाऱ्या कमिशनचे वाटे पडले आहेत. चेंबूर येथे एक शाळकरी चिमुरडा व साकीनाक्यात 60 वर्षांचा वृद्ध याच खात्यापित्या नगरपित्यांनी घेतलेला बळी आहे. अश्विनी भिडे यांचा राजीनामा मागण्यापेक्षा पालिकेतील राजकीय शासनकर्त्यांवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्याची मागणी जोरात व्हायला हवी. मुंबई पालिकेवर नगरसेवकांचे राज्य नसून ठेकेदारांचे राज्य आता अवतरले आहे. शिवसेनेच्या नावाने बोटे मोडणाऱ्या अवलादीला आता तरी मुंबई महानगरपालिकेतील शिवसेनेचे महत्त्व समजले असेल. मुंबई महापालिका ठप्प पडली आहे. पालिकेच्या प्रत्येक मॅनहोलला भ्रष्टाचाराचे बूच बसले आहे.

































































