गद्दार, बेइमान… सांगा कितीला विकला गेलात! तृणमूलमधून फुटलेल्या खासदार सयानी घोष यांना नागरिकांचा घेराव

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

तृणमूल काँग्रेसमधून फुटलेल्या खासदार सयानी घोष यांना आज त्यांच्याच मतदारसंघात प्रचंड रोषाचा सामना करावा लागला. एका 12 वर्षीय मुलीवर सामूहिक बलात्कार आणि हत्येची घटना उघडकीस आल्यानंतर त्या पीडितेच्या कुटुंबीयांच्या भेटीसाठी गेल्या होत्या. त्यावेळी संतप्त नागरिकांनी त्यांना घेराव टाकला. गद्दार, बेइमान अशी घोषणाबाजी करत तुम्ही किती पैशांमध्ये विकल्या गेलात, असा संतप्त सवाल नागरिकांनी केला.

सयानी घोष या ममता बॅनर्जी यांची साथ सोडत 19 बंडखोर खासदारांसोबत ‘एनसीपीआय’मध्ये सामील झाल्या. त्यावरून त्यांच्या मतदारसंघात नागरिकांमध्ये प्रचंड रोष आहे. आज त्या बराईपूर येथे बलात्कार पीडितेच्या कुटुंबीयांना भेटण्यासाठी गेल्या असता त्यावेळी नागरिकांचा रोष उफाळून आला. तेथे त्या काही नागरिकांशी चर्चा करत असताना अचानक लोकांनी त्यांना घेराव टाकला आणि जोरदार नारेबाजी सुरू केली.

सयानी घोष यांनी उत्तर देणे टाळले

सयानी घोष यांच्याविरोधात जोरदार नारेबाजी होत असताना एक जण त्यांना सातत्याने ‘कोतो टका बिक्री होले’ असे बोलत होता. याचा अर्थ किती पैशांमध्ये विक्री झाली, असा होतो. त्यावर घोष यांनी उत्तर न देताच तेथून निघून जाण्यातच धन्यता मानली.