महायुतीत कोणताही नवीन पक्ष येणार नाही, राष्ट्रवादीबाबतच्या वावड्यांना फडणवीसांकडून पूर्णविराम

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

शरद पवार यांच्या नेतृत्वातील राष्ट्रवादी कॉँग्रेस महायुतीत जाणार असल्याची चर्चा आज दिवसभर माध्यमांत सुरू होती. दरम्यान मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी महायुतीत कोणताही नवीन पक्ष येणार नसल्याचे स्पष्ट करत राष्ट्रवादीबाबतच्या वावडय़ांना पूर्णविराम दिला.

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे ज्येष्ठ नेते जयंत पाटील आणि भाजपचे राष्ट्रीय सरचिटणीस विनोद तावडे यांच्यात मुंबईत बैठक झाल्याच्या बातम्या समोर आल्यानंतर राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे. शरद पवारांचा पक्ष भाजपसोबत जाणार का, अशी चर्चा रंगली आहे. यासंदर्भात पत्रकारांनी मुख्यमंत्री फडणवीस यांना प्रश्न केला असता महाराष्ट्रातून राष्ट्रीय लोकशाही आघाडीत किंवा राज्यातील महायुतीत सध्या कोणताही नवीन पक्ष येणार नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

‘पक्षाच्या विस्तारासाठी किंवा आगामी निवडणुकांसाठी कोणाचाही पक्ष पह्डण्याचा आमचा कोणताही हेतू नाही. शरद पवारांच्या पक्षाचे आमदार किंवा खासदार फोडण्याचा आमचा कोणताही प्रयत्न नाही,’ असे स्पष्ट करत त्यांनी या संभाव्य पक्षफुटीच्या चर्चांना फडणवीस यांनी पूर्णविराम दिला आहे.