सामना अग्रलेख – गोंधळलेले मुख्यमंत्री आणि त्यांची अफवांची फॅक्टरी

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

भारतीय राजकारण्यांचे व राजकीय संस्कृतीचे बारा वाजवून भाजपने देशाला संकटात ढकलले आहे. त्यामुळे भाजपबरोबर किंवा एनडीएबरोबर कुणी जात असेल तर ती आत्महत्याच ठरेल. भविष्यात भाजपचीच शकले होण्याची शक्यता आम्हाला जास्त दिसते. मुख्यमंत्र्यांच्या कार्यशैलीचे अनेकांना आश्चर्य वाटत असावे. राममंदिराच्या लुटीवर ते बोलत नाहीत. उपमुख्यमंत्री मिंधेंच्या गुंडांनी ठाणे जिह्यातील महिला डॉक्टरांवर खुनी हल्ला केला. त्यावर ते बोलत नाहीत, पण ‘एनडीए’त नवीन भिडूला जागा नाही वगैरे विषयांवर ते चवीने बोलतात. ते गोंधळले आहेत. थोडे निराशही वाटतात. दिल्लीत महाराष्ट्राच्या बाबतीत त्यांच्या मनाविरुद्ध घडामोडी होत असल्याचा हा परिणाम आहे!

महाराष्ट्रात एनडीएसोबत कुठलाही नवीन पक्ष येणार नाही. आता जे पक्ष आहेत तेच राहतील असे मुख्यमंत्री फडणवीस यांनी जाहीर केले आहे. श्री. फडणवीस किती हतबल आणि गोंधळलेले गृहस्थ आहेत ते या विधानावरून दिसते. शरद पवार यांच्या नेतृत्वाखालील राष्ट्रवादी काँग्रेस एनडीएमध्ये सामील होत असल्याच्या बातम्या भाजप गोटातून उडवल्या जात आहेत. भाजप म्हणजे बातम्या उडवण्याचा, अफवा पिकवण्याचा कारखाना आहे व मुख्यमंत्री स्वतः या कारखान्याचे चेअरमन आहेत. मुख्यमंत्र्यांच्या या कारखान्यात किमान दोन हजार पगारी लोक काम करतात व त्यावर महिन्याला कोट्यवधी रुपये खर्च होतात. (ज्याला आय.टी. सेल म्हटले जाते.) मुख्यमंत्र्यांनी अफवांचे कारखाने यशस्वीपणे उभारल्यामुळेच त्यांना ‘इफ्रामॅन’ ही उपाधी मिळाली असावी. महाराष्ट्राच्या मूळ प्रश्नांना बगल द्यायची असेल तर हे इफ्रामॅन अफवांच्या फॅक्टरीतला माल बाहेर काढतात व राज्यात गोंधळ उडवतात. आता शरद पवार यांचा पक्ष एनडीएत सामील होत असल्याची अफवा याच देवेंद्र फॅक्टरीने सोडली व त्यावर खुलासेही तेच करत आहेत. शरद पवार यांचा पक्ष एनडीएचा घटक पक्ष बनणार असल्याची शक्यता फडणवीस यांनी फेटाळून लावली. भाजपच्या अफवा फॅक्टरीने आधी असे जाहीर केले की, शरद पवार पक्षाचे खासदार फुटत आहेत. ते फुटले नाहीत तेव्हा सांगितले की, पवारांचा संपूर्ण पक्षच एनडीएत विलीन होतोय. मग ही थापसुद्धा पचली नाही तेव्हा सांगितले, सुनेत्रा पवार आणि पार्थ पवार वगळून दोन्ही राष्ट्रवादींचे विलीनीकरण होत आहे. आता यापैकी नक्की खरे काय ते स्वतः श्री. शरद पवारच सांगू शकतील. शरद पवार व फडणवीस यांची भेट होणार असल्याचेही जाहीर झाले आहे, पण ही भेट

महाराष्ट्र-कर्नाटक सीमा

प्रश्नाबाबत होणार आहे व या बैठकीस किमान पाच-पंचवीस नेते उपस्थित राहत आहेत. बेळगावातील महाराष्ट्र एकीकरण समितीचे मोठे शिष्टमंडळही या बैठकीत सहभागी होत असताना सीमा प्रश्नाच्या बैठकीत पवार-एनडीए विलीनीकरणावर गुप्त चर्चा होईल अशी बातमी फडणवीसांच्या फॅक्टरीतून बाहेर येणे हास्यास्पद. पवार पक्षाचे जयंत पाटील व भाजपचे विनोद तावडे एकमेकांना भेटले. तावडे, पाटील भेटले म्हणजे राष्ट्रवादी काँगेस नक्कीच भाजपच्या गोटात सामील होत आहे असा धुरळा उडवून महाविकास आघाडीत संशय निर्माण करायचा हाच हेतू होता. आता सत्य काय आहे ते स्वतः जयंत पाटील यांनीच सांगितले. ते सांगतात, ‘‘मुंबईच्या हॉटेलमध्ये एक संसदीय समितीची बैठक होती. त्या बैठकीला खासदार सुप्रिया सुळे उपस्थित होत्या. मधल्या वेळात काही कामासाठी मी त्यांना भेटायला गेलो. तेव्हा विनोद तावडेही तेथे होते. तावडेदेखील त्या संसदीय समितीचे सदस्य आहेत. त्यांच्याशी माझी सगळ्यांसोबत चर्चा झाली.’’ महाराष्ट्राचे राजकीय वातावरण इतके गढूळ बनले आहे की, कोणी कोणाला भेटूच नये. भेटलात तर खोटय़ा बातम्या सोडून गोंधळ उडवून द्यायचा. ज्या संसदीय समितीत तावडे-सुळे आहेत, त्यात शिवसेनेचे अरविंद सावंतदेखील आहेत. तेव्हा सावंत-तावडे-सुळे हेसुद्धा खुर्चीला खुर्ची लावून बसत असणारच. अर्थात हे अफवांच्या फॅक्टरीला कळले तर वेगळीच बातमी ते जन्माला घालतील व त्याचा नाहक त्रास तावड्यांना होईल. मुळात सध्याच्या राजकारणातले सूत्र असे आहे की, महाराष्ट्रात काय घडवायचे ते सर्व दिल्लीतून ठरवले जाते. राज्याच्या मुख्यमंत्र्यांना फक्त शेवटच्या क्षणी त्याबाबत सूचना दिली जाते. येथे कोणीही भाजप किंवा एनडीएत मनापासून विलीन होत आहेत असे चित्र नाही.

पैशांच्या जोरावर

आणि ‘निधी’च्या दादागिरीवर आमदार-खासदार फोडले जातात. पुन्हा जोडीला केंद्रीय तपास यंत्रणा आहेतच. आधीच दोन प्रमुख पक्ष त्यांनी फोडले व त्यांचे गट स्वतःच्या दावणीला बांधले. अजित पवारांचा गट एनडीएत असताना अमित शहा मूळ राष्ट्रवादीला सोबत घेतील हा विचार अक्कलशून्यतेचा आहे. राममंदिर लूट प्रकरणात भाजपचीच बेअब्रू देशभरात सुरू आहे. त्यांचा मूळ जनाधार कोसळत आहे. रामभक्त भाजपवर संतापले आहेत. भाजपच्या घसरगुंडीस किंवा अधःपतनास सुरुवात झाली आहे. हे ज्या शहाण्यांना कळले ते भाजपच्या बुडत्या नौकेत पाय ठेवणार नाहीत. महाराष्ट्रात भाजपच्या बेइमानीविरुद्ध लोकांत चीड पेटली आहे. त्यात रामद्रोहाचे प्रकरण उघड झाले. मोदी यांची लोकप्रियता रुपयाप्रमाणे घसरली आहे व अमित शहांना त्यांच्याच पक्षात विरोध सुरू झाला आहे. भारतीय राजकारण्यांचे व राजकीय संस्कृतीचे बारा वाजवून भाजपने देशाला संकटात ढकलले आहे. त्यामुळे भाजपबरोबर किंवा एनडीएबरोबर कुणी जात असेल तर ती आत्महत्याच ठरेल. भविष्यात भाजपचीच शकले होण्याची शक्यता आम्हाला जास्त दिसते. मुख्यमंत्र्यांच्या कार्यशैलीचे अनेकांना आश्चर्य वाटत असावे. राममंदिराच्या लुटीवर ते बोलत नाहीत. उपमुख्यमंत्री मिंधेंच्या गुंडांनी ठाणे जिह्यातील महिला डॉक्टरांवर खुनी हल्ला केला. त्यावर ते बोलत नाहीत, पण ‘एनडीए’त नवीन भिडूला जागा नाही वगैरे विषयांवर ते चवीने बोलतात. ते गोंधळले आहेत. थोडे निराशही वाटतात. दिल्लीत महाराष्ट्राच्या बाबतीत त्यांच्या मनाविरुद्ध घडामोडी होत असल्याचा हा परिणाम आहे!