शिंदे गटाचे हल्लेखोर नगरसेवक रमेश म्हात्रे यांना अटक; आदित्य ठाकरे, रोहित पवार डोंबिवलीत धडकताच पोलीस अॅक्शन मोडवर

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

शास्त्रीनगर रुग्णालयातील महिला डॉक्टर आणि परिचारिकांवर हल्ला करून त्यांना बेदम मारहाण करणारे शिंदे गटाचे हल्लेखोर नगरसेवक रमेश म्हात्रे यांना अखेर पोलिसांनी आज अटक केली. म्हात्रे यांच्यावर गुन्हा दाखल होऊनही सत्ताधाऱ्यांच्या दबावामुळे ते मोकाट होते. मात्र शिवसेना नेते, युवासेना प्रमुख आमदार आदित्य ठाकरे आणि राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार डोंबिवलीत धडकताच पोलीस अॅक्शन मोडवर आले आणि त्यांनी 24 तासांनंतर रमेश म्हात्रे यांना बेड्या ठोकल्या. म्हात्रे यांना उद्या न्यायालयात हजर केले जाणार आहे तर त्यांच्या हल्लेखोर साथीदारांना कल्याण कोर्टाने 10 जुलैपर्यंत पोलीस कोठडी ठोठावली.

शास्त्रीनगर रुग्णालयात मंगळवारी एका गर्भवती महिलेला दाखल करण्यात आले होते. रुग्णालयातील एनआयसीयूचे सर्व दहा बेड भरले असल्याने संबंधित महिलेला पुढील उपचारांसाठी अन्य रुग्णालयात हलविण्याचा सल्ला दिला. याच कारणावरून शिंदे गटाचे डोंबिवलीतील नगरसेवक रमेश म्हात्रे यांच्यासह त्यांच्या गुंड कार्यकर्त्यांनी रुग्णालयात येऊन दोन महिला व पुरुष डॉक्टर आणि नर्सना बेदम मारहाण केली. मारहाणीमुळे रुग्णसेवा करणारे डॉक्टर, नर्स दहशतीच्या छायेत असताना रमेश म्हात्रे मात्र उजळ माथ्याने फिरत होते. सत्ताधाऱ्यांच्या दबावामुळे पोलिसही त्यांना अटक करण्यास धजावत नव्हते. त्यामुळे राज्यभर संतप्त पडसाद उमटले. इंडियन मेडिकल असोसिएशननेही कामबंद आंदोलन केले. शिवाय शिवसेना नेते आदित्य ठाकरे यांनी सकाळी या गुंडगिरीविरोधात विधिमंडळाच्या अधिवेशनात आवाज उठवला. त्यानंतर आदित्य ठाकरे आणि राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार यांनी डॉक्टर आणि आरोग्य कर्मचाऱयांना न्याय देण्यासाठी आज थेट डोंबिवलीत धडक दिली. आदित्य ठाकरे, रोहित पवार डोंबिवलीत धडकताच गेल्या 24 तासांपासून थंड असलेले पोलीस अचानक अॅक्शन मोडमध्ये आले आणि त्यांनी अखेर रमेश म्हात्रे यांना अटक केली.

कल्याण, डोंबिवलीतील दवाखाने कडकडीत बंद

शास्त्रीनगर रुग्णालयातील डॉक्टरांवरील हल्ल्याच्या निषेधार्थ कल्याण-डोंबिवलीतील डॉक्टरांनी अत्यावश्यक सेवा वगळता ओपीडी बंद ठेवत कडकडीत आंदोलन केले. सर्व डॉक्टर, नर्स आणि आरोग्य कर्मचाऱ्यांनी काळ्या फिती लावून नगरसेवक रमेश म्हात्रे याचा निषेध केला.

म्हात्रे ठाण्याच्या सिव्हिल रुग्णालयात दाखल

डॉ. सृष्टी बाविस्कर, डॉ. वैभव सोळंकी, नर्स नमिता उबाळे, द्रव्या गिरी यांना मारहाण झाल्यानंतर विष्णूनगर पोलिसांनी रमेश म्हात्रे यांच्यासह रमेश पवार, प्रमोद उर्फ प्रकाश निकम, अक्षय कारंडे यांना अटक केली. त्यांच्या विरोधात महाराष्ट्र वैद्यकीय सेवा व्यक्ती व वैद्यकीय सेवा संस्था अधिनियम तसेच अनेक गंभीर कलमे लावण्यात आल्याची माहिती परिमंडळ 3 चे उपायुक्त अतुल झेंडे यांनी दिली. म्हात्रे यांना पोलीस कोठडीत ठेवले जाणार होते. मात्र छातीत दुखू लागल्याने त्यांना ठाण्याच्या सिव्हिल रुग्णालयात दाखल करण्यात आल्याचे सहायक पोलीस आयुक्त सुहास हेमारे यांनी सांगितले.

फक्त अटक नको, धिंड काढा, आदित्य ठाकरे यांनी ठणकावले

आदित्य ठाकरे यांनी शास्त्रीनगर रुग्णालयाला भेट देऊन जखमी डॉक्टर, परिचारिका आणि आरोग्य कर्मचाऱयांची विचारपूस केली. यावेळी त्यांनी संबंधितांना धीर देत या घटनेचा तीव्र निषेध केला. यावेळी आदित्य ठाकरे यांनी सरकारवर सडकून टीका केली. गुंड रमेश म्हात्रे यांना केवळ अटक करून भागणार नाही तर त्यांचे नगरसेवकपद रद्द करून त्यांची धिंड काढा, असे आदित्य ठाकरे यांनी ठणकावले.

संबंधित गर्भवती महिलेला शास्त्रीनगर रुग्णालयात आवश्यक एनआयसीयू सुविधा उपलब्ध नसल्यामुळे डॉक्टरांनी तिच्या आणि बाळाच्या सुरक्षिततेचा विचार करून अधिक सुविधा असलेल्या रुग्णालयात जाण्याचा सल्ला दिला होता. डॉक्टरांनी वैद्यकीय नैतिकता आणि रुग्णहित लक्षात घेऊन निर्णय घेतला. त्यामध्ये त्यांची कोणतीही चूक नव्हती. तरीही गुंड नगरसेवक आणि त्याच्या समर्थकांनी रुग्णालयात घुसून डॉक्टर, नर्स आणि कर्मचाऱयांना अश्लील शिवीगाळ केली, मारहाण केली. हा प्रकार अत्यंत संतापजनक आणि निषेधार्ह असल्याचे ते म्हणाले.

महाराष्ट्राच्या संस्कृतीला काळीमा

कोरोना काळातील डॉक्टर आणि नर्सच्या योगदानाची आठवण करून देताना आदित्य ठाकरे म्हणाले, कोरोनाच्या संकटात डॉक्टर आणि नर्स यांनी स्वतŠच्या जीवाची पर्वा न करता रुग्णांची सेवा केली, हजारो लोकांचे प्राण वाचवले. अशा सेवाभावी आरोग्य कर्मचाऱयांवर हात उचलणे ही महाराष्ट्राच्या संस्कृतीला काळीमा फासणारी घटना आहे. त्यामुळे आरोपींची धिंड काढून कायद्याचा धाक निर्माण करावा. शिंदे गटाच्या गुंड नगरसेवकाचे पद रद्द करून त्याला निवडणूक लढविण्यास अपात्र ठरवावे, अशी मागणी त्यांनी केली. यावेळी शिवसेना सचिव विनायक राऊत, उपनेते गुरुनाथ खोत, जिल्हाप्रमुख अभिजित सावंत आदी उपस्थित होते.

विकास निधी फोडाफोडीसाठी वापरल्यामुळे गुंडगिरी फोफावली – रोहित पवार

आम्ही आवाज उठवल्यानंतर रमेश म्हात्रे यांना अटक केली. फक्त अटक करून भागणार नाही. त्यांची दहशत मोडून काढण्यासाठी धिंड काढा असे खडे बोल रोहित पवार यांनीही पोलिसांना सुनावले. पोलीस संरक्षणात रमेश म्हात्रे यांची डोंबिवलीत गुंडागिरी सुरू असून गुंड प्रवृत्तीच्या नगरसेवकाला जर पोलीस संरक्षण मिळत असेल तर ही अत्यंत दुर्दैवी आणि लोकशाहीसाठी धोकादायक बाब आहे. फोडाफोडीच्या राजकारणातून सत्तेत आलेल्या सरकारला सर्वसामान्य जनतेच्या प्रश्नांशी काहीही देणे घेणे राहिलेले नाही. विकासासाठी असलेला निधी लोकप्रतिनिधी विकत घेण्यासाठी वापरला जात आहे. त्यामुळे गुंडगिरी फोफावली आहे असा आरोपही त्यांनी केला. राज्याचे आरोग्यमंत्री प्रकाश आबिटकर, स्थानिक आमदार रवींद्र चव्हाण कुठे आहेत असा सवालही रोहित यांनी केला.