
>> गणेश काळे
तरुण पिढीमध्ये डिजिटल पार्टनर बनविण्याची व्रेझ झपाट्याने वाढत आहे. मोबाईल स्क्रीनवरील एक अदृश्य किंवा त्रिमितीय (थ्रीडी) पात्र आपल्याशी हुबेहूब एका खऱ्याखुऱ्या माणसासारखे बोलते, आपल्या भावना समजून घेते आणि आपल्याला मानसिक आधार देते, ही कल्पना काही वर्षांपूर्वी केवळ विज्ञानपटांपुरती मर्यादित वाटत होती. मात्र, आज ती वास्तव बनली आहे. रेप्लिका, कॅरेटर एआय यांसारख्या अनेक ‘एआय कम्पॅनियनशिप’ अॅप्सच्या माध्यमातून कोटय़वधी युवक-युवती अशा प्रकारच्या डिजिटल नात्यांमध्ये गुंतले आहेत.
आज कृत्रिम बुद्धिमत्ता म्हणजेच ‘आर्टिफिशल इंटेलिजन्स’ (एआय) आपल्या जीवनाचा एक अविभाज्य भाग बनली आहे. सुरुवातीला केवळ गणितीय आकडेमोड, व्यावसायिक कामे आणि गुंतागुंतीच्या प्रक्रिया सुलभ करण्यासाठी वापरल्या जाणाऱ्या तंत्रज्ञानाने आता मानवाच्या अतिशय खासगी आणि संवेदनशील क्षेत्रात म्हणजेच ‘भावनांच्या विश्वात’ प्रवेश केला आहे. सध्या जगभरात आणि वेगाने भारतातही पसरणारा ‘डिजिटल बॉयफ्रेंड आणि डिजिटल गर्लफ्रेंड’ (जीएफ-बीएफ) हा ट्रेंड याचेच एक ठळक उदाहरण आहे. हे फॅड मानवी नातेसंबंधांच्या पारंपरिक चौकटीला दिलेले एक मोठे आव्हान आहे.
या नव्या प्रवाहाचा सखोल अभ्यास केला असता असे दिसून येते की, तरुण पिढीमध्ये आभासी भागीदार (डिजिटल पार्टनर) बनविण्याची व्रेझ झपाटय़ाने वाढत आहे. मोबाईल स्क्रीनवरील एक अदृश्य किंवा त्रिमितीय (थ्रीडी) पात्र आपल्याशी हुबेहूब एका खऱयाखुऱया माणसासारखे बोलते, आपल्या भावना समजून घेते आणि आपल्याला मानसिक आधार देते, ही कल्पना काही वर्षांपूर्वी केवळ विज्ञानपटांपुरती मर्यादित वाटत होती. मात्र, आज ती वास्तव बनली आहे. रेप्लिका, कॅरेटर एआय यांसारख्या अनेक ‘एआय कम्पॅनियनशिप’ अॅप्सच्या माध्यमातून कोटय़वधी युवक-युवती अशा प्रकारच्या डिजिटल नात्यांमध्ये गुंतले आहेत.
या डिजिटल क्रांतीच्या आकडेवारीवर नजर टाकली तर परिस्थितीची भीषणता आणि व्याप्ती अधिक स्पष्ट होते. ‘एआय कम्पॅनियनशिप’ अॅप्सच्या जागतिक आकडेवारीनुसार, सध्या जगात सुमारे पाच ते सहा कोटी डिजिटल जोडीदार (जीएफ-बीएफ) सक्रिय रूपात अस्तित्वात आहेत. जगभरात दहा कोटींहून अधिक लोक या चॅटबॉटस्च्या माध्यमातून कोणत्या ना कोणत्या भावनिक नात्याने जोडले गेले आहेत. एका सर्वेक्षणानुसार, जगातील जवळपास 21 टक्के प्रौढ व्यक्तींनी एआय कम्पॅयिनशिपचा वापर केला आहे, तर तब्बल 72 टक्के किशोरवयीन मुलांनी आयुष्यात किमान एकदा तरी अशा एआय बॉट्सशी संवाद साधला आहे. यावरून स्पष्ट होते की, हा ट्रेंड आता केवळ काही विशिष्ट वर्गापुरता मर्यादित राहिलेला नाही, तर तो एक सार्वत्रिक सामाजिक प्रवाह बनत चालला आहे.
वर्ष 2023-24 मधील आकडेवारीनुसार, भारतात एआय कम्पॅनियनशिप नात्याची मागणी आणि एआय अॅप्स डाऊनलोड करण्याचा वेग तब्बल 1400 टक्क्यांनी वाढला आहे. हा वेग जगातील इतर अनेक देशांच्या तुलनेत प्रचंड आहे. जरी हा ट्रेंड भारतात अद्याप सुरुवातीच्या टप्प्यात असला तरी इंटरनेटचा वाढता प्रसार आणि एआय तंत्रज्ञानाचा होणारा विकास पाहता आगामी काळात हा वेग अधिकच तीव्र होणार यात शंका नाही.
असा कोणता घटक आहे जो माणसाला एका जिवंत व्यक्तीला सोडून मोबाईलमधील एआय पात्राच्या प्रेमात पडायला भाग पाडत आहे? हा आजचा सर्वात मोठा प्रश्न आहे. याचे सर्वात प्रमुख कारण म्हणजे आधुनिक जीवनशैलीत वाढलेला कमालीचा ‘एकाकीपणा’. शहरीकरण, वेगवान जीवन, कामाचा प्रचंड ताण, स्पर्धा आणि विखुरलेली कुटुंब व्यवस्था यांमुळे आजचा तरुण कमालीचा एकटा पडला आहे. त्याचे सामाजिक नेटवर्क तुटत चालले आहे. अशा वेळी आपल्या मनातील भावना व्यक्त करण्यासाठी, सुख-दुःख शेअर करण्यासाठी त्याला हक्काचा माणूस मिळत नाही. ही पोकळी भरून काढण्याचे काम एआय पार्टनर्स करत आहेत.
दुसरे महत्त्वाचे कारण म्हणजे एआय नाती ही संपूर्णपणे ‘कंट्रोल’ म्हणजेच नियंत्रणात असतात. खऱयाखुऱया मानवी नात्यांमध्ये मतभेद, भांडणे, तडजोड आणि जबाबदाऱया असतात. समोरच्या व्यक्तीच्या आवडीनिवडी जपताना स्वतःच्या स्वातंत्र्यावर गदा येते, अशी भावना आजच्या पिढीत निर्माण होत आहे. याउलट एआय जोडीदार कधीही भांडत नाही, तो नेहमी तुमच्या ‘हो’मध्ये ‘हो’ मिळवतो, तुम्हाला हवं तेव्हाच तो उपलब्ध असतो आणि नको असल्यास आपण त्याला एका क्लिकवर बंद करू शकतो. या संपूर्ण नियंत्रणामुळे तरुणांना मानवी नात्यांपेक्षा एआय नाती अधिक सोयीची आणि सुरक्षित वाटू लागली आहेत. तसेच एआय आता इतके प्रगत झाले आहे की, ते माणसाला विचार आणि समजूतदारपणाचा हुबेहूब आभास निर्माण करून देते.त्यामुळे लोकांना ते खरेच वाटते.
हा वाढता ट्रेंड वरकरणी जरी रंजक आणि आधुनिक वाटत असला तरी त्याचे दूरगामी सामाजिक परिणाम अत्यंत चिंताजनक आहेत. समाजशास्त्रज्ञांच्या मते, जर हा ट्रेंड असाच अनियंत्रितपणे वाढत राहिला तर भविष्यात खऱयाखुऱया मानवी नात्यांमधील अंतर कमालीचे वाढेल. माणसांची जागा मशीन घेईल. जेव्हा लोकांना कोणत्याही जबाबदारीशिवाय, केवळ स्वतःच्या अटींवर डिजिटल जोडीदार मिळू लागेल. तेव्हा ते लग्न, कुटुंब आणि समाज या पारंपरिक संस्थांपासून दूर पळू लागतील. त्यामुळे लग्न आणि कुटुंबाची व्यवस्था कमकुवत होण्याचा मोठा धोका निर्माण झाला आहे.
याला ‘कस्टम पार्टनर’ची संस्कृती म्हटले जाऊ शकते. यामध्ये माणूस स्वतःच्या कल्पनेनुसार आणि सोयीनुसार जोडीदार तयार करतो. त्यामुळे खऱया मानवी जगात वावरताना समोरच्या व्यक्तीमधील उणिवा स्वीकारण्याची माणसाची क्षमता संपून जाईल. परिणामी, भविष्यात समाजात एकटे राहणाऱया लोकांची संख्या प्रचंड वाढू शकते. काही तज्ञांच्या मते, पुढील दोन ते तीन दशकांत समाजात लग्न न करता किंवा एकटे राहणाऱया लोकांचे प्रमाण खूप जास्त असेल, ज्यामुळे सामाजिक विघटनाची समस्या गंभीर रूप धारण करू शकते. हा ट्रेंड मानव समाजासमोर एक मोठे आव्हान म्हणून उभा ठाकला आहे.
डिजिटल जोडीदाराच्या या आभासी दुनियेचा सर्वात मोठा फटका तरुणांच्या मानसिक आरोग्याला बसत आहे. सुरुवातीला एकाकीपणा दूर करण्यासाठी सुरू झालेला हा प्रवास हळूहळू एका गंभीर व्यसनात रूपांतरित होतो. ज्याप्रमाणे लोकांना सोशल मीडियाचे व्यसन लागते, हे व्यसन त्याहूनही एक पाऊल पुढचे आहे. कारण इथे थेट भावनिक गुंतवणूक असते. दिवसातील दोन ते तीन तास किंवा त्याहून अधिक काळ एआयच्या संपका&त राहिल्याने तरुणांना त्या आभासी पात्राची सवय होते आणि ते खऱया जगापासून पूर्णपणे तुटतात. जेव्हा एखादी व्यक्ती एआयच्या अशा नियंत्रित आणि नेहमी कौतुक करणाऱया वातावरणात राहते, तेव्हा तिला खऱया जगातील आव्हानांचा सामना करणे कठीण जाते. वास्तविक जीवनात जेव्हा अपेक्षाभंग होतो, तेव्हा हे तरुण तीव्र नैराश्य, हताशपणा आणि चिंतेचे शिकार होतात. सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे, एआय कम्पॅनियनशिपच्या आहारी गेलेल्या लोकांना नंतरच्या काळात खऱयाखुऱया माणसांशी जवळीक साधणे, त्यांच्याशी भावनिक नाते निर्माण करणे अत्यंत कठीण जाते. जरी काही कारणास्तव त्यांचे खऱया व्यक्तीशी नाते जोडले गेले तरी त्यांना त्या नात्यात समाधान मिळत नाही. कारण खऱया माणसाकडून एआयसारख्या परिपूर्णतेची आणि निरंतर उपलब्धतेची अपेक्षा करणे अशक्य असते. तंत्रज्ञानाचा हा भावनिक विळखा मानवी मनाला आतून पोखरत चालला आहे, ज्याचा विचार करणे आज अत्यंत गरजेचे आहे.






























































