
मतदार यादी पुनरीक्षण (एसआयआर) कामासाठी शिक्षकांच्या सेवा घेण्याबाबत निर्माण झालेल्या प्रश्नावर संबंधित विभागांची तातडीची बैठक घेऊन उपाययोजना करण्यात येतील. शिक्षकांवरील अतिरिक्त कामाचा ताण कमी करण्यासाठी मंत्र्यांच्या दालनात लवकरच बैठक आयोजित करण्यात येईल, असे आश्वासन शिक्षण राज्यमंत्री डॉ. पंकज भोयर यांनी दिले.
अनुदानित माध्यमिक शाळांमधील बहुतांश शिक्षकांना मतदार यादी पुनरीक्षणाचे काम दिले आहे. त्यामुळे अनेक शाळांमध्ये शिक्षक उपलब्ध होत नसल्यामुळे विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होत असल्याची बाब, नियम ९२ अन्वये अर्धा तास चर्चेदरम्यान शिवसेना आमदार ज. मो. अभ्यंकर यांनी मांडली होती. एकेका शिक्षकाला अकराशे घरांचे एसआयआरचे काम दिले जात आहे. ज्या भागात त्यांची शाळा नाही, त्या भागाचे काम दिले जात असून त्यांना शाळेतून उचलून नेले जाते, वाईट वागणूक दिली जाते आणि एफआयआर दाखल केली जाते. हा शिक्षण विभागाच्या आदेशाचा अवमान आहे. त्यामुळे या अशैक्षणिक कामातून शिक्षकांची सुटका करावी, अशी मागणी अभ्यंकर यांनी केली.
शिक्षकांच्या निवडणूक कामकाजाबाबत न्यायालयीन निर्णयही झाले आहेत. मुख्य निवडणूक अधिकारी कार्यालयाने जारी केलेल्या सुधारित मार्गदर्शक सूचनांनुसार, शिक्षकांना बीएलओ (BLO) म्हणून नियुक्त करताना त्यांच्या अध्यापनात अडथळा येणार नाही, याची काळजी घ्यावी. हे काम सुट्टीच्या दिवशी किंवा अशैक्षणिक वेळेतच देण्याचे निर्देश आहेत. काही जिल्ह्यांत शिक्षकांना पूर्णवेळ कार्यमुक्त करण्याचे आदेश दिल्याचे निदर्शनास आल्यानंतर ते दुरुस्त करण्याचे निर्देशही देण्यात आले आहेत, असे राज्यमंत्री डॉ. भोयर यांनी स्पष्ट केले.



























































