व्हीआयपींना 24 मिनिटांत दर्शन; रांगेतील भाविक 24 तास ताटकळत! विठुरायाच्या दरबारातील विरोधाभास दूर करण्याचे आव्हान

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

>> सुनील उंबरे

वारकऱ्यांना सुलभ आणि तत्पर दर्शन देण्यासाठी मंदिरे समितीने केलेले नियोजन व्हीआयपी भाविक आणि दर्शनरांगेतील घुसखोर यांच्यामुळे कुचकामी ठरत आहे. त्यामुळे दर्शनरांगेत प्रामाणिकपणे उभ्या असणाऱया भाविकाला देवाच्या पायावर डोके टेकवायला 24 तासांहून अधिक वेळ लागतो, तर शॉर्टकट मार्गाने घुसखोरी करणाऱया ‘व्हीआयपी’ला अवघ्या 24 मिनिटांमध्ये दर्शन घडत असल्याचे दिसून येत आहे. विठुरायाच्या दरबारातील हा विरोधाभास दूर करण्याचे मोठे आव्हान प्रशासनासमोर आहे.

येत्या 25 जुलै रोजी पंढरपूरमध्ये आषाढी एकादशीचा सोहळा साजरा होत आहे. येणाऱया लाखो भाविकांना श्री विठ्ठल-रखुमाईचे सुलभ व तत्पर दर्शन व्हावे, यासाठी मंदिरे व्यवस्थापन, पोलीस प्रशासन आणि महसूल विभाग समन्वयाने नियोजन करत आहे. वारीच्या पार्श्वभूमीवर भाविकांना तत्पर दर्शन मिळण्याच्या दृष्टीने येत्या 16पासून श्री विठ्ठल मंदिर 24 तास खुले ठेवले जाणार आहे. दर्शनासाठी येणाऱया भाविकांना दर्शनरांगेत उभे राहता यावे, यासाठी गोपाळपूर येथे तात्पुरते नऊ पत्राशेड उभारण्यात आले आहेत. एका शेडमध्ये अडीच ते तीन हजार भाविक उभे राहू शकतात. येथे आवश्यक सोयीसुविधा उपलब्ध करून दिल्या आहेत. तसेच वारीकाळात जास्तीत जास्त भाविकांना दर्शनाचा लाभ व्हावा, यासाठी एक मिनिटात पस्तीस भाविकांना पदस्पर्श दर्शन मिळेल, अशी व्यवस्था केली आहे.

श्री विठ्ठलाचे चरण ते गोपाळपूर-पत्राशेड हे अंतर साधारण अडीच किलोमीटर आहे. येथे अडीच ते तीन हजार व्यक्ती उभ्या राहू शकतात. अनेकवेळा दर्शनरांग एकेरी न चालता तीन चार रांगेत चालते. दर्शन मंडपानंतर मंदिरात जाताना ही रांग पुन्हा एकेरी होते. एक किलोमीटरची तिहेरी रांग गृहीत धरली, तरी देवाच्या चरणापासून गोपाळपूरच्या पहिल्या पत्राशेडपर्यंत साधारणपणे सात ते आठ हजार भाविक पदस्पर्श रांगेत उभे राहू शकतात. मंदिरे समितीच्या व्यवस्थेप्रमाणे एक तासात 120 भाविक, असे गृहीत धरले तर आठ हजाराव्या भाविकाचे दर्शन चार ते पाच तासांत होणे अपेक्षित आहे. मात्र, समितीने केलेल्या नियोजनाप्रमाणे दर्शनव्यवस्था होताना दिसत नाही. गोपाळपूर पत्राशेडमध्ये उभ्या असलेल्या भाविकाला दर्शनासाठी किमान आठ ते दहा तासांचा वेळ लागतो. हा अवांतर वेळ लागण्याचे कारण म्हणजे दर्शनरांगेत होणारी घुसखोरी आणि मंदिर व्यवस्थापनाच्या माध्यमातून दिले जाणारे ‘शॉर्टकट व्हीआयपी दर्शन’ हेच आहे.

दरम्यान, वारीच्या तोंडावर रुजू झालेले जिल्हाधिकारी एन. कार्तिकेयन हे वारीचे सूक्ष्म नियोजन करीत आहेत. पालकमंत्री गोरे यांनीदेखील सर्व अधिकारी जिल्हाधिकाऱयांना देऊ केले आहेत. त्यामुळे जिल्हाधिकाऱयांनी भाविकांना सुलभ आणि तत्पर दर्शन देण्यासाठी व्हीआयपी दर्शन आणि दर्शनरांगेतील घुसखोरी रोखण्यासाठी प्रभावी उपाययोजना राबवावी, अशी मागणी भाविकांमधून होत आहे.

येथून होते घुसखोरी

– देवाचे चरण ते गोपाळपूर पत्राशेड या मार्गावर असलेले संत माउली दर्शन मंडपातील खुश्कीचे मार्ग, स्कायवॉक शेजारी असलेल्या स्थानिक लोकांच्या घरांतून, दर्शनरांगेत बंदोबस्तासाठी असलेले पोलीस, खासगी कमांडो आणि होमगार्ड यांच्याकडून केली जाणारी घुसखोरी, रांगेशेजारील मठ, धर्मशाळा यांच्या प्रवेशमार्गातून मोठय़ा संख्येने घुसखोरी चालते.

38 तासांचे रेकॉर्ड

– वारीच्या कालावधीत पदस्पर्श दर्शनरांग गोपाळपूर पत्राशेड भरून पुढे रांजणी रोडवर जाते. या रांगेत 50 हजारांहून अधिक भाविक उभे असतात. एकादशीच्या पर्वणीवर दर्शन घेण्यासाठी उभ्या असलेल्या भाविकांना 30 तासांहून अधिकचा वेळ लागतो. आषाढी एकादशीची शासकीय महापूजा, त्यानंतर होणारे सत्कार सोहळे आणि मंदिर स्वच्छता यामध्ये चार ते पाच तासांचा वेळ जातो. तोपर्यंत पददर्शन बंद राहते.