
वादळी वारे व तुफानी पावसाच्या तडाख्याने कल्याणच्या नेतिवली टेकडी परिसरात टेकडीचा काही भाग आज घरासह कोसळला. सुदैवाने ते घर रिकामे होते. त्यामुळे कोणतीही जीवितहानी झाली नाही. अन्यथा मोठा अनर्थ घडला असता. मातीचा ढिगारा आणि मलबा रस्त्यावर आल्याने काही काळ वाहतुकीचा खोळंबा झाला होता.
घर कोसळल्याची माहिती मिळताच कल्याण-डोंबिवली महापालिका प्रशासन, आपत्ती व्यवस्थापन पथक तसेच संबंधित अधिकारी तातडीने घटनास्थळी दाखल झाले. परिसराची पाहणी करून मलबा हटवण्याचे काम हाती घेण्यात आले असून आवश्यक उपाययोजना केल्या सुरू आहेत. प्रभाग क्षेत्र अधिकारी सविता हिले यांनी सांगितले की, नेतिवली टेकडी परिसरातील धोकादायक भागात राहणाऱ्या सुमारे ४० नागरिकांचे तातडीने सुरक्षितस्थळी स्थलांतर करण्यात आले आहे.
नेतिवली टेकडी परिसरातील रहिवाशांना यापूर्वी दोन वेळा धोक्याची सूचना देणाऱ्या नोटिसा बजावण्यात आल्या होत्या. आता तिसरी नोटीस देऊन उर्वरित नागरिकांचेही स्थलांतर करण्यात येणार आहे. महापालिका प्रशासनाने नागरिकांना दुर्घटनास्थळी गर्दी न करण्याचे तसेच धोकादायक टेकडी परिसरापासून दूर राहण्याचे आवाहन केले आहे. हवामान विभागाने मुसळधार पावसाचा इशारा दिल्याने टेकडीलगत राहणाऱ्या नागरिकांनी विशेष सतर्कता बाळगावी, असेही प्रशासनाने म्हटले आहे.





























































