… तर कळव्याची अख्खी आदर्श चाळच वाहून गेली असती, पुराचा भयंकर लोंढा चाळीत घुसला; ठाणे पालिकेचा गलथान कारभार चव्हाट्यावर

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

आठवडाभर पडलेल्या तुफानी पावसाने कळवा, मुंब्यातील अनेक घरांमध्ये पाणी शिरले. त्यामुळे रहिवाशांचे अतोनात हाल झाले. धो धो पाऊस पडत असतानाच कळव्याच्या भास्करनगर परिसरातील अख्खी आदर्श चाळच वाहून गेली असती. डोंगरावरून पुराचा भयंकर लोंढा चाळीत घुसला आणि एकच धावाधाव झाली. दैव बलवत्तर म्हणून सर्वजण बचावले अन्यथा मोठा अनर्थ घडला असता. डोंगरावरून नाल्यात पडणारे पाणी चोकअप झाल्याने गंभीर परिस्थिती ओढवली. यानिमित्ताने ठाणे पालिकेचा गलथान कारभार चव्हाट्यावर आला आहे. आपत्कालीन यंत्रणेने तातडीने धाव घेऊन परिस्थिती आटोक्यात आणली.

कळव्यातील भास्करनगर भागात आदर्श चाळ असून तेथे अनेक वर्षांपासून कुटुंबे राहतात. महापालिकेने सर्व नालेसफाई झाल्याचा दावा केला असला तरी कळव्याच्या डोंगरातून वाहणारे पावसाचे पाणी मोठ्या प्रमाणावर खाली कोसळले, ते थेट चाळीतच कोसळले. नैसर्गिक नाले चोकअप झाल्याने पावसाचे पाणी अडले गेले आणि ते काहींच्या घरात घुसण्यास सुरुवात झाली. ही बाब समजताच ठाण्याचे जिल्हाधिकारी डॉ. श्रीकृष्ण पांचाळ यांनी आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. संदीप माने यांना लगेच उपाययोजना करण्याचे आदेश दिले.

युद्धपातळीवर केली नालेसफाई तहसीलदार उमेश पाटील यांनी ठाणे महापालिका व वनविभागाच्या अधिकाऱ्यांशी संपर्क साधून स्वतः घटनास्थळाची पाहणी केली. त्यावेळी नैसर्गिक प्रवाहातील नाले चोकअप असल्याचे आढळून आले. हे पाणी व डोंगरावरून वेगाने वाहणारे पाणी यामुळे आदर्श चाळीला धोका निर्माण झाला. पालिकेच्या पथकाने धाव घेऊन युद्ध पातळीवर नालेसफाई केली. त्यानंतर नैसर्गिक प्रवाह पूर्ववत झाला. मात्र तोपर्यंत चाळीतील रहिवाशांचा जीव टांगणीला लागला होता.