
महाराष्ट्र शिक्षक पात्रता परीक्षा (टीईटी) पेपरफुटी प्रकरणात तपास यंत्रणांना मोठे यश मिळाले आहे. गेल्या काही महिन्यांपासून पोलिसांना हुलकावणी देणाऱ्या आणि देशातील अनेक परीक्षांचे पेपर फोडणाऱ्या मुख्य सूत्रधार बिजेंद्र कुमार गुप्ता याला अखेर बिहारमधून अटक करण्यात आली आहे.
बिजेंद्र गुप्ताच्या अटकेमुळे राज्यातील लाखो विद्यार्थ्यांचे भवितव्य टांगणीला लावणाऱ्या या महाघोटाळ्याची पाळेमुळे मुळापासून उपटून काढणे पोलिसांना शक्य होणार आहे. त्याला पुणे विमानतळावर आणण्यात आले असून तेथून त्याला पुण्यात नेण्यात येईल, अशी माहिती भिवंडी पोलिसांनी दिल्याचे वृत्त ‘एएनआय’ने दिले आहे.
Main accused of Maharashtra TET (Teacher Eligibility Test) paper leak, Bijendra Kumar Gupta, arrested from Bihar by Bhiwandi Police. He has been brought to Pune Airport from where he will be taken to Pune: Bhiwandi Police pic.twitter.com/RE5LPQ76gQ
— ANI (@ANI) July 25, 2026
कोण आहे बिजेंद्र गुप्ता?
बिहारमधील समस्तीपूरचा रहिवासी असलेला बिजेंद्र गुप्ता हा गेल्या 25 वर्षांपासून देशातील विविध राज्यांमध्ये पेपरफुटीचे रॅकेट चालवत आहे. ओडिशा कर्मचारी निवड आयोग (ओएसएससी), बिहार लोकसेवा आयोग (बीपीएससी) आणि मध्य प्रदेश लोकसेवा आयोग (एमपीपीएससी) यांसारख्या मोठ्या परीक्षांचे पेपर फोडण्यातही त्याचा सहभाग राहिला आहे.
स्टिंग ऑपरेशनदरम्यान कॅमेऱ्यात कैद, पत्नीलाही अटक
नीट पेपरफुटीच्या पार्श्वभूमीवर झालेल्या एका गुप्त स्टिंग ऑपरेशनमध्ये बिजेंद्र गुप्ता कॅमेऱ्यात कैद झाला होता. या स्टिंगदरम्यान त्याने नॅशनल टेस्टिंग एजन्सीच्या (एनटीए) परीक्षेतील त्रुटींचा फायदा कसा घेतला जातो आणि पेपर फोडणे हा आपला व्यवसाय कसा आहे, याबद्दल उघड दावे केले होते. बिजेंद्र गुप्ता हा फरार असताना महाराष्ट्र पोलिसांनी यापूर्वीच त्याची पत्नी सुमन गुप्ता हिला बिहारमधून अटक केली होती. बिजेंद्रच्या पैशांच्या सर्व व्यवहारांची माहिती तिच्याकडे होती आणि तिने त्याला पळून जाण्यास मदत केली होती. या सिंडिकेटचे जाळे महाराष्ट्र, बिहार, उत्तर प्रदेश, दिल्ली आणि हरियाणा या राज्यांमध्ये पसरले आहे. आग्र्या येथील प्रिंटिंग प्रेसमधून अवघ्या 8 हजार रुपयांत बुटाच्या सोलामध्ये लपवून हा पेपर बाहेर काढण्यात आला होता.
विद्यार्थ्यांचा उद्रेक
दरम्यान, पेपर फुटल्याचे स्पष्ट झाल्यानंतर 28 जून रोजी होणारी टीईटी परीक्षा पुढे ढकलण्यात आली आहे. यामुळे सुमारे 6 लाख विद्यार्थ्यांचे भवितव्य अधांतरी सापडले असून या घोटाळ्याच्या चौकशीसाठी 20 सदस्यांची विशेष तपास पथक स्थापन करण्यात आली आहे.





























































