
आपल्या धडाकेबाज फलंदाजीने साऱ्या जगाचे लक्ष ओढावून घेतलेल्या वैभव सूर्यवंशीला येत्या विश्वचषकात संघात सामिल करुन घेण्याची मागणी होत आहे. टीम इंडियाचे माजी यष्टीरक्षक-फलंदाज फारूख इंजिनिअर यांनी ही मागणी केली आहे. तसेच वैभवला रोहित शर्मासोबत सलामीला पाठवावे असेही त्यांनी म्हटले आहे.
”आगामी २०२७ च्या एकदिवसीय विश्वचषकाचा विचार करता, वैभवने संघात स्थान मिळवण्यासाठी पुरेसे कौशल्य सिद्ध केले असून, कर्णधार रोहित शर्मासोबत त्याने डावाची सुरुवात करावी. यासाठी भारतीय संघाने आपल्या फलंदाजीच्या क्रमात थोडे बदल करण्याची गरज असल्याचे इंजिनिअर यांनी स्पष्ट केले. त्यांच्या मते, शुभमन गिलला चौथ्या क्रमांकावर आणि विराट कोहलीला नेहमीप्रमाणे तिसऱ्या क्रमांकावर फलंदाजीला पाठवले पाहिजे”, असे फारूख इंजिनिअर म्हणाले
“माझ्या मते शुभमन गिल आणि वैभव सूर्यवंशी ही एक उत्तम जोडी ठरू शकते. गिल हा एक क्लास खेळाडू आहे आणि तो सध्याच्या संघातील सर्वोत्तम फलंदाज आहे. त्यामुळे गिलने चौथ्या क्रमांकावर फलंदाजीला यायला हवे.”
एकदिवसीय क्रिकेटमध्ये उजव्या आणि डाव्या हाताच्या फलंदाजांची जोडी संघासाठी अधिक फायदेशीर ठरते, यावर बोलताना ते म्हणाले म्हणाले की “शुभमन गिल हा हवेत फटकेबाजी करणारा फलंदाज नाही. एकदिवसीय सामन्यांमध्ये उजव्या आणि डाव्या हाताची जोडी योग्य ठरते. त्यामुळे रोहित सोबत सूर्यवंशीने डावाची सुरुवात करू द्यावी.”




























































