
>> डॉ. बसवेश्वर रामचंद्र चेणगे
आषाढ महिन्यापासून विविध सण सुरू होतात. त्यापैकी एक महत्त्वाचा सण म्हणजे गुरुपौर्णिमा. आपल्या गुरुप्रती कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी भारतात दरवर्षी आषाढी पौर्णिमा ही गुरुपौर्णिमा (व्यास पौर्णिमा) म्हणून साजरी केली जाते.
प्राचीन काळी गुरुकुल शिक्षण पद्धती अस्तित्वात होती तेव्हा आपले घर सोडून गुरुकुल म्हणजेच गुरूच्या आश्रमात राहून शिक्षण घेतले जायचे. आश्रमातील सर्व विद्यार्थ्यांना समान वागणूक मिळायची. भारतीय संस्कृतीमध्ये गुरुशिष्य परंपरा हे ज्ञान, अध्यात्म आणि कौशल्याच्या हस्तांतरणाचे एक अत्यंत पवित्र आणि अद्वितीय माध्यम मानले गेले आहे.
भारतातील विविध विद्या, कला आणि आध्यात्मिक वारसा पिढ्यान्पिढ्या जतन करून ठेवण्यात या परंपरेचा सिंहाचा वाटा आहे. प्रत्येकाच्या जीवनात गुरूचे अनन्यसाधारण महत्त्व असते. अज्ञानाच्या अंधकारातून आपल्या शिष्याच्या जीवनातील अज्ञानाचा अंधकार दूर करून त्याचे जीवन प्रकाशमान करण्याचे काम गुरू करतात. या गुरुकुल व्यवस्थेमध्ये गुरू पुस्तकी ज्ञानाबरोबरच वेद, शस्त्रविद्या, कला, नीतीशास्त्र व स्वावलंबनाचे धडे देत असत. त्या काळात अध्यात्म व नैतिकतेचे धडे दिले जात असत. तसेच विविध क्षेत्रांतील शिक्षण दिले जायचे. त्यामुळे या व्यवस्थेतील विद्यार्थी सर्वच क्षेत्रांत पारंगत होत होते. त्यावेळी गुरुशिष्यांमधील नाते हे खूप घनिष्ठ होते. आपल्या गुरूप्रती असणारी निष्ठा, आदर व प्रेम यांचे एक दुर्मिळ उदाहरण म्हणजे गुरू द्रोणाचार्य आणि एकलव्य यांचे आहे. आता काळ बदलला आहे. आजच्या काळात अशा प्रकारची गुरुशिष्य परंपरा होणार नाही. कारण आपण सर्वच जण प्रॅक्टिकल झालो आहोत. आजच्या काळातील द्रोणाचार्य अशा प्रकारची मागणी करायचे धाडस करणार नाही आणि आजच्या काळातील एकलव्य अशा प्रकारे कोणतेही दान देणार नाही ही वस्तुस्थिती आहे.
आज शाळा-महाविद्यालयातील शिक्षण पद्धती बदलत आहे. नवीन राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाची अंमलबजावणी सुरू झाली आहे. शाळा-महाविद्यालयांना समान यंत्रणा अकॅडमी व क्लासेसच्या माध्यमातून उभी राहिली आहे. त्यामुळे गुरूंचे महत्त्व कमी होऊ लागलेले आहे. सर्वत्र पैशांचा बाजार झाला आहे. त्यामुळे ज्ञान देण्यापेक्षा नोकरीसाठी व पुढील पदवीसाठीच्या परीक्षेपुरते शैक्षणिक साहित्य देऊन घोकमपट्टीवर भर दिला जातोय. परीक्षेचे पेपर फोडून परीक्षेपूर्वी नोटस्, महत्त्वाची माहिती दिली जाते. जे ते पुरवतात ते पैसे मिळवतात. त्यांनाच आजचे विद्यार्थी गुरू मानतात. इतका फरक पूर्वीच्या आणि आजच्या शिक्षण पद्धतीत पडला आहे. शिक्षणाची पातळी घसरली आहे.
औपचारिक व अनौपचारिक शिक्षण पद्धतीबरोबर व्यावसायिक शिक्षण पद्धतीवर आज भर दिला जात आहे. केंद्र सरकारने कौशल्य विकासावर आधारित शिक्षण पद्धतीचा पुरस्कार केला आहे. त्यामुळे आजच्या युवकांच्या हाताला काम मिळेल अशी परिस्थिती असली तरी त्यांना योग्य दिशा व मार्गदर्शनाची गरज आहे. काळाच्या ओघात शिक्षण पद्धती बदलली, गुरूच्या जागी शिक्षक आले. त्यापुढे जाऊन ती जागा आज मार्गदर्शक व डिजिटल गुरूने घेतली आहे. आज शिक्षणाकडे व्यवसाय म्हणून पाहिले जाते. व्यवसाय म्हटला की, व्यवहार आला. व्यवहारात नात्याला शून्य किंमत असते. आज गुरुकुल शाळांमध्ये निवास व भोजनाच्या व्यवस्थेसह प्रती विद्यार्थी फी ठरलेली असते. अशा या व्यवस्थेतील विद्यार्थ्यांकडून शिक्षकांप्रती आदराची भावना कशी बरे ठेवला येईल? त्यामुळे आजच्या पालकांची भूमिका फार महत्त्वाची आहे.
रोजच्या जीवनात आपण आता प्रॅक्टिकल राहिले पाहिजे. जो आपल्याला चांगला सल्ला देईल, आपले हित पाहील त्याला आपण गुरू केले पाहिजे. आपण एखाद्यावर अंधपणाने प्रेम करतो, विश्वास ठेवतो अशाच व्यक्तीने आपल्याला दणका दिला व आपल्याला आपली जागा दाखवली तर आपण त्यालाही गुरुस्थानी मानले पाहिजे. कारण त्याने आपल्याला कसे वागावे हे शिकवलेले असते. आजचा जमाना हा डिजिटल झालेला आहे. आपल्याला चॅट जीपीटी, जेमिनी, गुगलकडून मार्गदर्शन मिळते. त्यामुळे तेही आपले गुरू आहेत असे मानले पाहिजे. आपण आपल्या मार्गाने, अनुभवातून नवनवीन गोष्टी शिकत जातो. हा अनुभवसुद्धा आपला गुरूच असतो आणि शेवटी कामच कामाचा गुरू असतो असेही म्हणतात. जेव्हा आपण एखादे काम करीत असतो, तेव्हा त्याच कामातून आपल्याला पुढील नवीन काम करण्याची कल्पना सुचत असते. त्यामुळे आपण अशा सर्वच गुरूंचे व मार्गदर्शकाचे सतत स्मरण करीत राहिले पाहिजे.
गुरूचे महत्त्व सांगताना संत कबीर आपल्या दोह्यामध्ये म्हणतात,
गुरु गोविंद दोऊ खडे,
काके लागू पाय ।
बलिहारी गुरु आपने,
गोविंद दियो बताय ।।
गुरू आणि ईश्वर दोघे माझ्यासमोर उभे राहिले तर मी प्रथम मला घराकडे जाण्याचा मार्ग ज्या गुरूंनी दाखवला, त्या गुरूंना वंदन करेन.































































